|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

गुरु परंपरा

graphic footer

श्री चिन्मयानंद महाराज

पुण्यशील आमुची औदुंबर ही नगरी ।
नांदतो तिथे नित भक्तांचा कैवारी ।।
नाम धारण करूनी सार्थची चिन्मयस्वामी ।
गुरूपरंपरा ही चालवितो निष्कामी ।।

श्री तुकाराम महाराज

असे आत्मज्ञानी विदेही महात्मा ।
तया चिंतनी हो सुखी देह आत्मा ।
अशा थोर योगी पुरुषा नमावे ।
तुकाराम स्वामी नमू नग्न भावे ।।

श्री पूर्णानंद महाराज

गो-भूमी धन-धान्य-वैभव
द्विजां देवोनि संतोषिले ।
भावे षडूस अन्नदान करूनि
सर्वांस संतर्पिले ।।

श्री सहजानंद महाराज

गोचरस्वामी करी अन्नदान ।
गुरुभक्ती ज्यांची शुक्र-कचासमान ।।
औदार्य ज्यांचे कर्णासमान ।
वंदू तया गोचरा पुण्यवान ।।

श्री सच्चीदानंद महाराज

अध्यात्मज्ञानाची प्रिती भवचित्ती ।
संशय बंधापासून निवडी निजवृत्ती ।।
श्रद्धाभावे केली परम गुरुभक्ती ।
जयदेव जयदेव जय सद्गुरूनाथा ।
सच्चिदानंदा तब पदी माथा ।।

श्री शिवरामानंद महाराज

भक्ती ज्याने केली, मारुतीसमान ।
जनसेवा करी, मातेसमान ।।
संन्यास घेतला, गादीचे भूषण ।
शिवरामानंद हे, नामाभिधान ।।

श्री नित्यानंद महाराज

संन्यास दीक्षेचा मंत्र सांगितला ।
भक्त विष्णूदास संतकवी झाला ।।
जीभेवर वास सरस्वतीने केला ।
उभे नित्यानंद भक्‍त कल्याणाला ।।

श्री रामानंद महाराज

हे नाथा मम तू पिता, जननीही,
तू बंधू तू सोयरा।
माझा मित्र तरी जगात सखया,
तूचि नसे दुसरा ।।

श्री वासुदेवानंद महाराज

वाह अमृतसिद्धी निर्झर अशी वाणी
जयाची खरी ।
जिज्ञासू कुणी आर्त पाहनी तया होई
कृपा निर्भरी ॥।

श्री पुरुषोत्तमानंद महाराज

आता काही न मागणे गुरुवरा भक्तास तू एकला । आशीर्वाद तुझा असो सतत की,
द्यावीमति निर्मला ।॥।
सर्वांच्या मनीचे हरूनि सदया, किल्मिष नि आपदा ।

श्री वामनानंद महाराज

श्री औदुंबरग्राम स्वर्ग दुसरे, भासे जना भूवरी ।
जेथे चिन्मयमूर्तीचा मठ असे, त्या रम्य पीठावरी ।।
झाले सद्गुरू शांतदांत सुमति, ब्राह्मण्य भक्तार्ती हा ।
श्री सद्गुरू वामनानंद वंदन तुम्हां,साष्टांग भावे सदा ।।

श्री माधवानंद महाराज

तुझ्या सेवेने झाले मी कृतार्थ ।
तुझ्या कृपेने जीवन होते सार्थ ।।
अणू-रेणूंमध्येही आम्हां तू दिसावे ।
हे सद्गुरू माधवानंद पद वंदू भावे ।।

उमरखेडची गुरुपरंपरा-नाथपरंपरा

आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने श्रीदत्तसंप्रदाय, श्रीसमर्थ संप्रदाय,नाथसंप्रदाय, वारकरी संप्रदाय (भागवत धर्म) आणि महानुभाव संप्रदाय असे ईशवरोपासनेचे ५ संप्रदाय किंवा परंपरा किंवा पंथ आहेत. श्रीचिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेडची गुरुपरंपरा ही नाथपरंपरा असून यापरंपरेत योग व भक्ती यांचा सुरेख संगम झाला आहे. या संस्थानास दोन शतकांचा इतिहास असून अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे आदिनाथांपासून ही गुरुपरंपरा श्रीचिन्मयानंद महाराजांपर्यंत व नंतर विद्यमान मठाधिपतीप.पू. श्री माधवानंद महाराजांपर्यंत अविरतपणे सुरू आहे.

श्री चिन्मयानंद महाराजांचे ब्रह्मा, विष्णू ब महेशस्वरूपी तीन अवतारी शिष्योत्तम म्हणजे - श्री सहजानंद महाराज (गोचरस्वामी उमरखेड, जे श्री चिन्मयानंद महाराजांचे उत्तराधिकारी होते), श्रीमत्‌ परमहंस श्री तुकाराम महाराज (श्रीतुकामाई, ब्रह्मानंद महाराज, येहळेगांव) आणि श्री पूर्णानंद महाराज (शेवाळा) हे होत. श्री चिन्मयानंद महाराजांच्या महासमाधी ग्रहणानंतर श्रीसहजानंद महाराजांनी त्यांच्याच उमरखेडच्या राहत्या वाड्यात त्यांच्या समाधीची स्थापना करून श्रीचिन्मयमूर्ती संस्थानची मुहूर्तमेढ रोवली.

या गुरुपरंपरेत विद्यमान मठाधिपती हे त्यांच्या इच्छेनुसार योग्य अशा भावी पुरुषाची मठाधिपती म्हणून निवड करतात. मठाधिपतींची सूत्रे ग्रहण करण्यापूर्वी विधीपूर्वक संन्यासदीक्षा घेणे बंधनकारक असते. स्वामी सहजानंदांनंतर सच्चिदानंद - शिवरामानंद - नित्यानंद - रामानंद - वासुदेवानंद - पुरुषोत्तमानंद - माधवानंद (विद्यमान मठाधिपती) अशी ही गुरुपरंपरा आहे.

श्रीसहजानंद स्वामींच्या हातावर श्रीकाशीक्षेत्री दशाश्‍वमेध घाटावर प्रगट झालेल्या द्वादश ज्योतिर्लिंगस्वरूप श्री विश्‍्वंबर देवतेचे दररोज, पूजन, अर्चन व विद्वान ब्रह्मवृंदांद्रारे नामस्मरण यावर संस्थानचा भर असून “सहज बोलणे हाचि उपदेश' हे तत्त्व आहे. 'शिष्यांचा करण्या विकास, श्रमणे' हा ध्यानीमनी ध्यास आहे. नामस्मरण, भागवत धर्म, वारकरी संप्रदाय, श्री विश्वंभर व श्री पांडुरंगाची कास धरून सर्वसामान्यांपासून ते सर्वांच्याच कल्याणाची तळमळ असलेल्या, दीनदुबळ्या जनांच्या उद्धारासाठीच अवतरित झालेल्या श्री चिन्मयमूर्ती संस्थानच्या आध्यात्मिक ख्यातीच्या मठाधिपतींची ही दिव्य संतपरंपरा आहे. नि:स्पृहतेची, सत्याची आणि भक्तीची ही जी अमृतवेल श्री चिन्मयानंद महाराजांनी लावली, ती वेल आता विद्यमान मठाधिपती प.पू. श्री माधवानंद महाराजांनी गगनावर नेली आहे.

श्री चिन्मयमूर्ती संस्थानची मूळ नाथपंथीय असणारी ही दिव्य व विशाल सद्‌गुरू परंपरा पुढे भक्‍ती-ज्ञान परंपरेने वारकरी, रामदासी, हरदासी, कीर्तन परंपरेत एखाद्या महासागराप्रमाणे प्रवाहित झाली आहे. याच गुरुपरंपरेतील परमहंस जीवन्मुक्त थोर योगी श्रीतुकामाई यांचेद्वारा अनुग्रहित प्रात:स्मरणीय नामावतारी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, श्री ब्रह्मचैतन्य हनुमंत महाराज, वावरहिरेकर (जि. सातारा), प.पू. श्री रामजीबापू महाराज (समाधी मठ, येहळेगाव), प.पू. श्री नंदी महाराज, कवाणा (जि. नांदेड), श्री उपेंद्रस्वामी, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य डॉ. कुर्तकोटी महाभागवत (माजी शंकराचार्य, श्रीकरवीर पीठ, कोल्हापूर), वाणी अवतार पू. श्री तात्यासाहेब केतकर (मालाड, मुंबई), जालन्याचे श्री आनंदसागर महाराज व श्री रामानंद महाराज, श्री रामानंद महाराजांचे सत्शिष्य पू. श्री प्रल्हाद महाराज (साखरखेर्डा), त्यांचे शिष्य महामहोपाध्याय श्री यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे (चतुर्वेदेश्‍वर, सावरगाव, जि. जालना), श्रीसहजानंद महाराजांचे शिष्योत्तमद्रय श्री शंकरानंद महाराज, केसापूरी, जिल्हा बीड आणि श्री दत्तावतारी श्री रंगनाथ महाराज (आनंदी आत्मानंद सरस्वती, नाव्हा, ता. जि. जालना), त्यांचे शिष्य व उत्तराधिकारी पू. श्री श्‍वासानंद महाराज, मेहकर (समाधी मठ, श्रीक्षेत्र काशी), श्री पूर्णानंद महाराज, शेवाळा यांचे थोर शिष्य श्री आप्पाजी महाराज (पाटणबोरी), श्री नित्यानंद महाराजांद्रारे संन्यासदीक्षा ग्रहण केलेले श्री विष्णूदास महाराज (श्री पुरुषोत्तमानंद स्वामी, माहूर) आणि श्री वामनानंद महाराजांद्रारे अनुग्रहित थोर विभूती श्री ज्ञानेश्वर महाराज, माऊली, (चाकरवाडी, जि. बीड) अशा काही थोर संत-महात्म्यांचा नामोल्लेख करणे अनिवार्य ठरेल. उमरखेड मठात चंद्रग्रहणानिमित्त थोर दत्तावतारी प.प.श्री बासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज (थोरले स्वामी महाराज, टेंबे स्वामी महाराज) यांचाही मुक्काम होता.

अशा या थोर श्री चिन्मयमूर्ती संस्थानाला फार उच्च व आध्यात्मिक गुरुपरंपरा प्राप्त असून, या गुरुपीठाद्वारे आपल्या संस्कृतीचे, वेदविद्येच्या जतनाचे आणि सुसंस्कृत समाज निर्माण करण्याचे महान कार्य अविरतपणे सुरू आहे. या गुरुपीठाचे हजारो-लाखोंनी शिष्य व भक्‍त असून, सर्वांना सोप्या व सुलभ अशा भक्तीमार्गास लावून त्यांचा आध्यात्मिक विकास व उद्धार करण्याचे कार्य या गुरुपीठाद्वारे निरंतरपणे सुरू आहे.