|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

श्री चिन्मयानंद महाराज

graphic footer

पुण्यशील आमुची औदुंबर ही नगरी ।
नांदतो तिथे नित भक्तांचा कैवारी ।।
नाम धारण करूनी सार्थची चिन्मयस्वामी ।
गुरूपरंपरा ही चालवितो निष्कामी ।।

(सौ. दीपाबाई दिनकरराव देशमुख, विडुळ)

श्रीचिमण श्रीकृष्णभट जोशी म्हणजेच श्री चिन्मयानंद महाराज हे उमरखेडजवळील चुरमुरे जहागीरचे. त्यांना पुसदच्या नाथसंप्रदायी श्री विठ्ठलकिंकर महाराज (भिकाजी देशपांडे) यांचा अनुग्रह झाला.

या गुरुपरंपरेतील प्रत्येक पीठाधीश परमोच्च पदाला पोचलेले आहेत. धर्मास ग्लानी आल्यामुळे भगवंत स्वामी चिन्मयानंद महाराजांच्या रूपाने उमरखेडला अवतरले. स्वामींच्या अत्युत्कट भक्तीमुळे हरि मोरेश्वर मामलेदारांनी हरण केलेली श्रीकृष्णाची मूर्ती संध्यापात्रात प्रकट झाली. पंढरपूर येथे कार्तिकीच्या उत्सवात मठात धान्याचा एकही दाणा शिल्लक राहिला नसताना स्वामींच्या दृढ श्रद्धेमुळे पंढरीनाथाने तेथील एका सावकारास स्वप्नदृष्टांत देऊन त्याचेकरवी आवश्यक ते सर्व किराणा सामान स्वामींना पुरवले. कर्ममार्ग व भक्तीमार्ग यावर महाराजांचा विशेष कटाक्ष होता. ते स्वत: एकही क्षण भगवत्चिंतन व नामसंकीर्तन यावाचून वेळ वाया घालवित नसत. प्रत्येक पुरुष हा श्रीविठ्ठल व स्त्री श्रीरुक्माबाई आहे असे ते समजत. संतकवी श्री दासगणू महाराजांनी श्री चिन्मयानंद महाराजांची थोरवी वर्णन करताना त्यांना 'श्री ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा अवतार' असे संबोधिले आहे. आपल्या 'संतकथामृतात' ते म्हणतात -

अधिकार चिन्मयानंदाचा । किती वर्णू मी साचा । अवतार ज्ञानेश्‍वराचा । होते महाराज प्रत्यक्ष ।।

चिन्मयानंद महाराजांचे ब्रह्मा, विष्णू, महेशस्वरूपी तीन शिष्य - श्री सहजानंद महाराज (गोचरस्वामी, उत्तराधिकारी, उमरखेड मठ), श्री तुकामाई (येहळेगांव) व श्री पूर्णानंद महाराज (शेवाळा) हे होत. वैशाख कृ. एकादशी, शके १७७७ रोजी वयाच्या १00 व्या वर्षी श्री चिन्मयानंद महाराजांनी उमरखेडच्या स्वत:च्या राहत्या वाड्यात समाधीग्रहण केले. तत्पूर्वी वैशाख व. ७ शके १७७७ रोजी त्यांनी संन्यासदीक्षा घेऊन प्रद्युम्न सरस्वती' हे नाव धारण केले. तथापि, भक्तांना 'चिन्मयानंद' हे नांव गोड वाटून त्याचीच वाच्यता होऊ लागली. श्री चिन्मयानंद महाराजांचे उत्तराधिकारी श्री सहजानंद महाराजांनी त्यांच्या समाधीची स्थापना करून श्री चिन्मयमूर्ती संस्थान उमरखेडची मुहूर्तमेढ रोवली.