|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

श्री वासुदेवानंद महाराज

graphic footer

वाह अमृतसिद्धी निर्झर अशी वाणी जयाची खरी ।
जिज्ञासू कुणी आर्त पाहनी तया होई कृपा निर्भरी ।।
शिष्यांचा करण्या विकास श्रमणे ध्यानीमनी ध्यास हा ।
वासुदेव पदारविंद सुरसा, सेवो मनोभृंगहा ।॥।

श्रीरामानंद महाराजानंतर त्यांचे भाचे श्री वासुदेवानंद महाराज उमरखेड संस्थानचे मठाधिपती झाले. हे पूर्वाश्रमीचे श्री हरिभाऊ कावळे (कुलकर्णी), रा. कोंडुर, ता. कळमनुरी, जि. हिंगोली. पटवारगिरीमुळे त्यांच्या सरकार दरबारी चांगल्या ओळखी होत्या. ते कुशल व्यवस्थापक होते. त्यांचा शिष्यसंप्रदाय खूप वाढला. त्यांनी उमरखेड, येहळेगांव, मरडगाव, करंजाळा येथील मठ व मंदिरांसाठी जमिनी खरेदी करून संस्थानच्या उत्पन्नात भर टाकली. बऱयाच शिष्यांनीही गावोगावी संस्थानला जमिनी अर्पण केल्या. श्रीवासुदेवानंद महाराजांनी येहळेगांव मठाच्या सभामंडप, पाकशाळा आणि बारवाचे काम करून गावात बर्‍याच जागाही खरेदी केल्या. संस्थानतर्फे दरवर्षी ज्येष्ठ व. एकादशीला पंढरीच्या वारीला मठाधिपती हे सोबत ब्रह्मवृंद, शिष्यमंडळी यांना घेऊन जात असतात. पंढरपूर येथे जागेची अडचण भासू लागली. तेव्हा स्वामींनी पंढरपूर येथे गोबिंदपुऱ्यात चंद्रभागेच्या तिरावर एक मोठा वाडा खरेदी करून सर्वांचीच थांबण्याची सोय केली.

त्यांच्या आशीर्वादामुळे अनेक निपुत्रिकांना संतानप्राप्ती झाली. त्यांनी नदीत बुडणाऱ्या शिष्याचे प्राण वाचविले. त्यांनी एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या गावांना पुडीसाठी उपस्थित राहण्याचा चमत्कार केला आहे. स्वामींनी भगवानराव देशमुख सिरसाळकर (श्री वामनानंद महाराज) यांना विरसणी येथे त्यांच्या वयाच्या अकराव्या - बाराव्या वर्षी उपदेश देऊन त्यांना उमरखेडला घेऊन आले. त्यांना प्रवासात सोबत ठेवून त्यांचेकडे श्रीविश्‍वंभराची पूजा सोपवली.

स्वामींनी आपल्या हयातीतच श्री लिंबाजीनाईक नेब (श्री पुरुषोत्तमानंद महाराज) यांच्याकडे मठाधिपतीची सूत्रे सोपवली. त्यानंतर ते आठ वर्षे हयात होते. श्रीवासुदेवानंद महाराज फाल्गुन शु. पंचमी शके १८८५ रोजी अनंतात विलीन झाले. त्यांना मार्लेगावजवळ पैनगंगातिरी जलसमाधी देण्यात आली.