|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

श्री सहजानंद महाराज

graphic footer

गोचरस्वामी करी अन्नदान ।
गुरुभक्ती ज्यांची शुक्र-कचासमान ।।
औदार्य ज्यांचे कर्णासमान ।
वंदू तया गोचरा पुण्यवान ।।

श्री चिन्मयानंद महाराजानंतरचे मठाधिपती श्री सहजानंद महाराज हे पूर्वाश्रमीचे श्री गणेश जयरामभट पोळकट (मूळचे हिवळणी, ता. कळमनुरी). वडील सराफीनिमित्त ढाणकी, ता. उमरखेड येथे आले. श्रीसहजानंद महाराजांनीच आपले सद्गुरू श्री चिन्मयानंद महाराजांची समाधी त्यांच्याच राहत्या वाड्यात स्थापन करून श्रीचिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेडची मुहूर्तमेढ रोवली.

स्वामी सहजानंद महाराज हे काशीक्षेत्री दशाश्‍वमेध घाटावर गंगातिरावर आपल्या हातात पार्थिव शिवलिंग धारण करून ध्यानमग्न बसले असताना तेथील एका संन्याशाने त्यांच्या हातावरील शिवलिंग काढून गंगेत टाकून दिले. त्याचबरोबर स्वामींच्या हातावर दुसरे शिवलिंग आपोआप प्रगट झाले. त्या दुष्टाने पुन्हा पुन्हा लिंग नष्ट करावे व स्वामींच्या हातावर आपोआप दुसरे निर्माण व्हावे असा क्रम १0७ वेळा झाला व शेवटी स्वामींच्या हातावर स्फटिकाचे द्वादश ज्योतिर्लिंगस्वरूप प्रतिमा असलेले स्वयंभू श्रीविश्‍वंभर भगवंत प्रगट झाले. हे श्रीचिन्मयमूर्ती संस्थानचे आराध्यदैवत असून दररोज पूजन, अर्चन व रुद्राभिषेकाने उपासना विद्वान ब्रह्मवृंदांद्वारे केली जाते.

स्वामींनी पुडीच्या यजमानाचे मृत झालेले बालक जिवंत केले. स्वामींच्या आशीर्वादामुळे नेपाळच्या राजाला पुत्रप्रापती झाली. स्वामींच्या भक्तीभावाने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष श्री पांडुरंगांनी मूर्तीतून प्रगट होऊन त्यांना प्रेमभराने आलिंगन दिले. स्वामींच्या पुण्यप्रभावामुळे ऐन वैशाख मासात कोरड्या पडलेल्या गोदावरी नदीस भरपूर पाणी येऊन सर्वांना गोदास्नान घडले. महान दत्तावतारी श्री माणिकप्रभू महाराजांनी माणिकनगर, हुमनाबाद येथे स्वामी सहजानंदांचे प्रेमभराने स्वागत करून त्यांना शैली, शृंगी व नाना वस्त्रालंकार अर्पण केले. स्वामी आपल्या भक्त व शिष्यांच्या इच्छेखातर आपल्या नाकात नथनी, कानात बाळ्या, पायात तांब्या-रूप्याचे वाळे, हातात काकने, डोळ्यात अंजन त्यांच्याकरवी परिधान करून त्यांची नवसपूर्ती करून घेत असत. आपल्या भक्तांसाठी स्वामी स्वत: कोणताही त्रास सहन करीत होते.

स्वामींनी गोचरतव्रत धारण केले होते. या व्रतात स्वामी गाईप्रमाणे अन्न-पाणी सेवन करीत होते. त्यामुळे त्यांचे नांव गोचरस्वामी असे पडले. स्वामींनी महान दत्तावतारी संत श्री रंगनाथ महाराज (आनंदी आत्मानंद सरस्वती, समाधी मठ नाव्हा, ता. जि. जालना) तसेच केसापुरीच्या (ता. माजलगाव, जि. बीड) श्री शंकरानंद महाराजांना अनुग्रहित करून त्यांना थोर आध्यात्मिक अधिकार प्रदान केला. श्रीरंगनाथ महाराजांचे सत्शिष्य व उत्तराधिकारी श्री बाळाभाऊ महाराज 'पितळे, मेहकरकर (श्वासानंद महाराज) हे होते. यांची समाधी श्रीक्षेत्र काशी येथे आहे.

वयाच्या ८0 व्या वर्षी आषाढ व. ३ शके १८0१ रोजी स्वामींनी पुणतांब्याजवळील गोदातिरी वसलेल्या लाखबापतरा (ता. वैजापूर,जि. औरंगाबाद) या गावी आपल्या पार्थिव देहाचे विसर्जन केले. त्यांचे उत्तराधिकारी स्वामी सच्चिदानंद महाराजांनी त्यांची वस्त्रसमाधी उमरखेडच्या मठात श्रीचिन्मयानंद महाराजांच्या समाधीशेजारीच बांधून घेतली. उमरखेड मठाच्या भिंतीवर खालील श्लोक कोरलेला आहे -

॥ श्री गोपालकृष्णाय नम: ।। श्रीगुरु चिन्मयमूर्ती पद्मपद्मींचा मिलिंद गोचर हो । वंशी पोळकटाच्या आला हा ज्ञानरूपी दिनकर हो ।। गोदा भक्‍तीबलाने ज्याने निर्जळ वनात आणविली । तो गोचराख्य सद्गुरू दीनाची माय येथे शिव झाली ॥। पुण्यस्तंभासन्निध गोदेच्या उत्तरेस वापतरी । आषाढ कृष्णपक्षी ही भवनदिची अमोल्य थोर तरी ।। अक्षयिंची स्थित झाली, तृतीयेला तारण्या भवाधीत । वामनसुत बापूचे हा पुरवो हेत सद्गुरूनाथ ।।

समाधी शके १८0१, श्रीसद्गुरू गोचरस्वामी सहजानंद पदाब्जमिलिंद रामकृष्णबापू डोईफोडे इंगोलीकर.