श्री सच्चिदानंद महाराज
अध्यात्मज्ञानाची प्रिती भवचित्ती ।
संशय बंधापासून निवडी निजवृत्ती ।।
श्रद्धाभावे केळी परम गुरुभक्ती ।॥
जयदेव जयदेव जय सद्गुरूनाथा ।
सच्चिदानंदा तब पदी माथा ।।
श्री सहजानंद महाराजानंतर श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेडच्या मठाधिपती पदावर श्रीसच्चिदानंद महाराज विराजमान झाले. हे पूर्वाश्रमीचे श्री सीताराम ऊर्फ आबासाहेब विठ्ठलराव कुलकर्णी, रा. कुक्कडगांव, ता. जि. बीड. त्यांनी श्रीसहजानंद महाराजांच्या आज्ञेनुसार उमरखेड मठाचे बांधकाम ज्येष्ठ शु. त्रयोदशी, शके १७७७ रोजी सुरू केले. भक्तीमार्गापेक्षा ज्ञानमार्गाकडे त्यांचा विशेष कल होता. त्यांनी परंपरेतील संतांच्या समाधीचा शोध लावून त्याची महती ग्रंथित करून ठेवली. अभंग रचनेद्वारे साध्या सोप्या भाषेतून भक्तांना गोड वाणीत मार्गदर्शन केले. तसेच परंपरेवर श्लोकबद्ध स्तोत्र रचनाही केली. रामपुरी लिंबाजीबुबा, ता. गेवराई, जि. बीड येथे वैशाख व. ६ शके १८१४ रोजी त्यांनी या नश्वर देहाचे विसर्जन करून ब्रह्मानंदी लीन झाले. त्यांची वस्त्रसमाधी उमरखेड मठात श्री चिन्मयानंद महाराजांच्या समाधीच्या शेजारीच आहे.