|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

लेख संग्रह

graphic footer
ज्येष्ठ कृ. २ , गुरुवार, दिनांक १६.६.२०२२ प.पू.श्री पूर्णानंद महाराज ( शेवाळा , ता.कळमनुरी , जि. हिंगोली ) यांची पुण्यतिथी

श्री चिन्मयानंद महाराज ,  उमरखेडचे तीन अवतारी ब्रह्मा - विष्णू - महेशस्वरुप अधिकारी शिष्य म्हणजे - श्री सहजानंद महाराज ( श्री गोचरस्वामी महाराज ) उमरखेड , जि. यवतमाळ , श्रीमत् परमहंस श्री तुकाराम महाराज ( श्री ब्रह्मानंद महाराज , श्री तुकामाई ) येहळेगाव तुकाराम , ता. कळमनुरी , जि. हिंगोली आणि श्री पूर्णानंद महाराज ( श्री रामचंद्रपंत शेवाळकर उर्फ श्री रावसाहेब महाराज ) शेवाळा , ता. कळमनुरी जि. हिंगोली .

गो भूमी धनधान्य वैभव द्विजां देवोनी संतोषिले ।
भावे षड्रस अन्नदान करुनि,सर्वांस संतर्पिले ।।
प्रेमे गौरविले गुरु अतिथीला वंदूनिया तत्पदा ।
पूर्णानंद पदास वंदन असो, माझे सदासर्वदा 

ज्यांनी मानवात किंवा पशूत , सर्वत्र ईश्वरच पाहिला , ज्यांनी आपल्या हयातभर गाईच्या गोठ्यातच स्वयंपाक करून घेतला , अशा महान तपस्वी  --- श्री पूर्णानंद महाराजांचे  --  संक्षिप्त चरित्र पाहू या.
 
भगवंताच्या आज्ञेनुसार श्री श्रीधर महाराज यांनी कंदकुर्ती  ( जि. निजामाबाद , आंध्रप्रदेश ) येथे  श्री रामभक्तीसाठी प्रथमावतार घेतला . तदनंतर त्यांनी कामारी 
गावात श्री सदाशिवपंत पांडे आणि राजाबाई यांच्या पोटी  " राम " या नांवाने द्वितीयावतार धारण केला . हेच श्री पूर्णानंद महाराज होत. हे भगवंताचे द्वितीयावतार . यानंतरचे तृतीयावतार म्हणजे  --- श्री पूर्णानंद महाराज समाधिस्थ झाल्यानंतर  ते पाटणबोरीच्या श्री रामानंद महाराजांच्या पुतण्याचे पुत्र ( नातू ) श्री माधवराव महाराज  पाटणबोरीकर यांच्या रुपाने अवतरले . 

श्री रामचंद्र महाराज ( श्री पूर्णानंद महाराज ) यांचे   पिता त्यांच्या  बालपणीच वारल्यामुळे माता दळण कांडण करून मुलांचे पालनपोषण करीत होती. व्रतबंधानंतर श्रीरामचंद्रांना उमरखेडच्या श्रीचिन्मयानंद महाराजांचा उपदेश मिळाला . गुरुआज्ञेनुसार ते  भागीरथी बाईंशी विवाहबद्ध झाले. ते कामारीचे पांडेपण करून गृहस्थाश्रम चालवत असत . 'अतिथी देवो भव ' म्हणून विपुल अन्नदान करीत. तसेच प्रखर देवभक्तीही होतीच.

कामारी नगरीत जन्मूनी गुरो , केले जगा पावन ।
तारिले कुल - आप्त - मूढ - जडही सत्पंथी त्या लावून ।।
भावें चिन्मयमूर्ती सद्गुरुवरा , संपूजियलें सदा ।
पूर्णानंद पदांस वंदन असों , माझे सदासर्वदा ।। 

 एके दिवशी श्रीरामचंद्रपंत पूजेत बसले असतांना सरकारी शिपाई घरी येवून त्यांना  म्हणाला , " ताबडतोब दप्तर घेऊन चावडीवर चला. तहसीलदार साहेब आलेले आहेत. आता हे पूजेचे ढोंग बंद करा . " असे काहीही अद्वातद्वा तो  बोलू लागला. या बोलण्याचा पंतांना राग येवून त्यांनी पूजा तशीच ठेवून दिली व दप्तर घेऊन चावडीत गेले. तपासणीत यत्किंचितही चूक आढळून न आल्यामुळे तहसीलदार संतुष्ट झाला. पण पंत त्यास म्हणाले , " आता या दप्तराला मी हातदेखील लावणार नाही. कारण यामुळे मला देवाचे काहीच करता येत नाही. नरजन्म पुन्हा पुन्हा  मिळत नसल्यामुळे या जन्मी जर रघुवीराचे नामस्मरण केले नाही तर जन्म मरण फेर्यात अडकल्याशिवाय रहाणार नाही. " असे म्हणून त्यांनी सर्वांना नमस्कार केला व  कामारी सोडून दिली आणि नेवरीस आले. 

त्यागोनि कुळकर्णी -  वृत्ति - सदना - ग्रामा - मही - वैभवा ।
शेवाळा नगरीत राहुनी गुरों  , आराधिले माधवा ।।
केले रम्य तसें पुरश्चरणची , गायत्रिचेही मुदा ।
पूर्णानंद पदांस वंदन असो , माझे सदासर्वदा ।।

नेवरीस ते आल्या - गेल्यास जेवू  घालत  असत. एकेदिवशी त्यांच्याघरी चिमूटभर देखील पीठ नसतांना त्यांनी साठ माणसांना पोटभर जेवू घालून तृप्त केले.  त्यामुळे लोक त्यांना फार मानू लागले. 

काही दिवसानंतर ते नेवरीहून  येवून शेवाळा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली येथे स्थाईक झाले. तेथे त्यांनी कयाधू नदीच्या तीरावर अग्नीहोत्र संपादून गायत्री पुरश्चरण केले. विपुल प्रमाणात अन्नदान केले. त्यामुळे लोक त्यांना " रावसाहेब " म्हणू लागले.

 एके दिवशी एक गृहस्थ शेवाळा गावात दंडवत घालीत आला. त्याच्यासोबत बरेच स्त्री पुरुष होते. वाजंत्री, ताशे वाजवत ते गावात आले. गावात आल्यानंतर , " हा काय प्रकार आहे ,"  असे गांवकर्यांनी  विचारले असता त्यांच्यातील एक गृहस्थ म्हणाला की, " आम्ही मागे श्रीधर महाराज, कंदकुर्ती, यांना एक नवस केला होता. तेच येथे श्री रावसाहेब शेवाळकर महाराजांच्या रुपात अवतरित झाले आहेत. त्यांचा नवस फेडण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत ."  त्यावेळेस तेथील गावकर्यांना श्री  रावसाहेब महाराजां चा  अधिकार फार  मोठा आहे हे कळून आले आणि ते स्वतःला धन्य समजू लागले. या घटनेमुळे श्री रावसाहेब महाराजांची किर्ती आणखी  वाढली आणि बरेच भक्त दर्शनासाठी येवू लागले .

एकदा श्रीमहाराज लाडखेडे या गावी दाजी नावाच्या भक्ताच्या आमंत्रणानुसार भोजनासाठी गेले. यावेळी दाजीची मुलगी घरी फार आजारी असल्यामुळे त्यांची पत्नी त्यांना म्हणाली की , " मुलगी बीमार असल्यामुळे श्रीमहाराजांना नंतर  बोलवता येईल. " यावर दाजी तिला म्हणाले, " आपल्या जीवनाचा तर  क्षणाचाही भरवसा नाही. श्रीमहाराज आपल्या घरी जेवले तर आपल्या  सात पिढ्या उद्धरुन जातील." असे म्हणून त्याने श्रीमहाराजांना भोजनासाठी आमंत्रित केले.भोजनासाठी  नाना पक्वान्ने केली. श्रीमहाराज त्याच्या घरी येण्यापूर्वी त्याने पत्नीस आजारी मुलीसह वरती माडीवर पाठवून दिले व सांगितले की, " यदाकदाचित मुलगी वारली तर तशीच वरच बसून रहा. रडू नकोस. "  खाली पंगत बसली. इकडे मुलीची प्रकृती बिघडुन ती मृत झाली. खाली श्रीमहाराज व भक्तमंडळींची भोजने आटोपल्यानंतर श्रीमहाराज दाजीला म्हणाले, " तुझी पत्नी व मुलगी कोठे आहे . त्यांना दर्शनासाठी घेवून ये. " दाजी म्हणाला , " आपण त्रिकालज्ञ आहात. " असे म्हणून पत्नी व मृत झालेल्या कन्येस घेऊन दाजी  खाली आले.   लोक आपसात कुजबुजू लागले. हे पाहून श्री महाराजही स्तब्ध झाले. त्यांनी मग हातात अंगारा घेतला व गोवर्धनधारी श्रीकृष्णाचा धावा केला. व म्हणाले, " माझी लाज आता तूच राख ." ,असे म्हणून त्या मृत मुलीस अंगारा लावला. आणि काय आश्चर्य ! अंगारा लावताच त्या मुलीस शुद्धी  येवून ती उठून बसली. सर्वांना आनंद झाला. त्यांनी श्री रावसाहेब महाराजांचा जयजयकार करून त्यांच्या चरणावर लोळण घेतली. मग श्री  महाराजांनी त्या मुलीचे नाव " शबरी " असे ठेवले. 

गार्हस्थाश्रम हा सुरम्य करुनी , मोक्षार्थही साधिला ।
केले गांग - जला - घ्रता - उठविली - कन्या - मृता धेनुला ।। 

भक्तेच्छा परिपूर्ण देऊनी करिं , मोक्षादिकां संपदा ।
पूर्णानंद पदांस वंदन असो , माझे सदासर्वदा ।।

एकदा गंगाबिसन या बोरीच्या भक्ताकडे श्री महाराज गेले होते. श्री  महाराजांचा स्वयंपाक गोठ्यातच करावा लागे. पण त्याच्या गोठ्यात एक गाय आजारी पडून मृत होण्याच्या मार्गावर होती. तिला उठतादेखील येत नव्हते. म्हणून तो श्रीमहाराजांना हे कारण सांगून म्हणाला की, "  दुसर्या चांगल्या जागी स्वयंपाक करु. " परंतु श्रीमहाराज हे ऐकून सरळ गोठ्यात गेले . तेथे ती गाय हातपाय ताणून मरणप्राय झालेली त्यांनी पाहिली. त्यांनी तिच्या अंगावरुन मायेने हात फिरविला आणि म्हणाले  , " मायबाई, उठा. येथे आज रामास नैवेद्य होणार आहे. त्यामुळे होणाऱ्या धुराचा तुला त्रास होईल. तरी माते, आता बाहेर जा व स्वयंपाक झाल्यावर गोग्रास खाण्यासाठी मात्र जरुर ये. " असे श्रीमहाराज बोलताच आश्चर्य घडले. ती गाय सतेज दिसू लागली. व ती  एकदम उठून रानात चरावयास गेली. हे तिथे असणार्या सर्व भक्तांनी पाहिले. सर्वांनाच आनंद झाला. श्री महाराजांचा अधिकार कळल्यामुळे सर्वजण नतमस्तक झाले आणि सर्वांनी श्री  महाराजांचा जयजयकार केला. सर्वजण पंक्तीत भोजनासाठी बसले असतांना ती गाय बरोबर आपला गोग्रास  --  श्रीरामाचा प्रसाद -- घेण्यासाठी आली होती. 

श्री पूर्णानंद महाराजांनी असंख्य भक्तांचा उद्धार करुन त्यांना परमार्थाकडे वळविले. त्यांचे अधिकारी शिष्य म्हणजे श्री रामानंद महाराज ( श्री आप्पाजी महाराज )पाटणबोरी, ता.केळापूर , जि.यवतमाळ .

ज्येष्ठ व. २ शके १८०८ रोजी कयाधूतिरी शेवाळा येथे श्रीमहाराज आपल्या वयाच्या ८१ व्या वर्षी  समाधीस्थ झाले. तत्पूर्वी त्यांनी संन्यासदीक्षा ग्रहण केली. त्यांचे नामाभिकरण " पूर्णानंद महाराज "  असे झाले. येथे त्यांचा मठ व संस्थान  ( श्री पुर्णानंद महाराज संस्थान , शेवाळा )  असून प.पू. श्री श्याम महाराज वारंकर हे विद्यमान मठाधिपती आहेत.  ( मोबा.नं. ९६३७८४५८४५ ) . त्यांच्या अधिपत्याखाली दैनंदिन पूजन - अर्चन , नित्य - नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम आणि विविध उत्सव - महोत्सव संपन्न होतात .

श्री सहजानंद महाराज , श्री तुकामाई आणि श्री पूर्णानंद महाराज या तिघां  ब्रह्मा - विष्णू - महेश स्वरुपी अवतारी संतांचे एकमेकांवर निरतिशय प्रेम होते. श्री पूर्णानंद महाराज यांनी महासमाधीग्रहण केल्याचे श्री तुकामाईंना कळल्यावर त्यांनी उद्गार काढले ---- " ऊन ऊन आणि    म ऊ भात खायला घालणारा माझा रावसाहेब शेवटी गेला की रे ! " 

अष्टाभ्राष्ट धरा शकोदगयनी ग्रीष्मीं व्ययाद्वांतरीं ।
ज्येष्ठ कृष्णदली यमाख्य तिथीला , रात्री गुरुवासरी ।।
त्यागोनि गुरु पांचभौतिक वपु गेले स्वकीयापदां ।
पूर्णानंद पदांस वंदन असो , माझे सदासर्वदा ।।

श्री पुर्णानंद महाराजांच्या श्री चरणीं कोटी कोटी प्रणाम . मार्गदर्शन :- प.पू.श्री श्याम महाराज वारंकर , विद्यमान मठाधिपती , श्री पूर्णानंद महाराज संस्थान , शेवाळा 

संकलन :- डॉ.डी.देशमुख कामठेकर , औरंगाबाद .

धन्यवाद. 
श्री पूर्णानंद महाराज की जय .