|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

लेख संग्रह

graphic footer
येहळेगावचे संतश्रेष्ठ श्री तुकामाई

येहळेगाव येथे वसे एक संत ।
तुकाराम नामे जय लोक गात ।।
जयाचे गुरु चिन्मयानंद झाले ।
गुरु - शिष्य हे नाथपंथी भुकेले ।।

येहळेगाव येथे वास्तव्य ज्यांचे ।
प्रख्यात शिष्य गुरु चिन्मयांचे । 
विदेही स्थितीने जगीं वर्तताहे ।
तुकाराम साधु जीवन्मुक्त आहे ।।

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जे ब्रह्मनिष्ठ सत्पुरुष भारतामध्ये होते त्यांच्यापैकी एक विलक्षण योगीराज आणि अति थोर महात्मा म्हणजे श्रीमत् परमहंस 
श्री तुकाराम महाराज (श्री ब्रह्मानंद महाराज , श्री तुकामाई , तुकामाय) येहळेगाव , ता.कळमनुरी जि.हिंगोली हे होत. "मूर्तिमंत विरक्ती , शांती व आनंद"
असे श्री तुकामाईंचे वर्णन करता येईल . काहींच्या मते ते श्री दत्तप्रभूंचे अवतार होते , तर काही त्यांना श्री शंकरांचे अवतार मानतात तर काही श्री शुकमुनींचे अवतार
मानतात .त्यांच्या काळात त्यांच्या गावचे व परिसरातील लोक त्यांना " वेडा तुक्या " असे म्हणत असत . कारण त्यांची बाह्य राहणी फारच अस्ताव्यस्त असे . श्रद्धाहीन,
अपवित्र व लबाड माणसांना श्री तुकामाई शिव्या देवून हाकलून लावीत असत ; परंतु ज्यांचे अंतःकरण शुद्ध आहे अशा माणसांशी त्यांचे बोलणे फारच मार्मिक व अर्थपूर्ण असे .

लोकांना शिव्या देणारे , लोकांना दगड फेकून मारले तरी लोक त्यांचा पाठलाग करीत असे श्री तुकाराम चैतन्य हे अतिशय उच्च कोटीचे जीवन्मुक्त संतपुरुष हे उमरखेडच्या
नाथपंथीय श्री चिन्मयानंद महाराजांचे पट्टशिष्य होते .नाथपरंपरेत पहिल्या श्रेणीत शोभेल इतकी योगविद्या श्री तुकामाईंजवळ होती . ते नेहमी उच्च अशा आध्यात्मिक अवस्थेत
वावरत असत. या ऋषितुल्य महाज्ञान्याची वृत्ती सदा आनंदी असून त्यांचा ईश्वराच्या नामस्मरणावर फार विश्वास होता. ते स्वतः श्री विठ्ठलोपासक होते. 

त्याकाळच्या मोठमोठ्यांना श्री तुकामाईंची योग्यता कळली नाही. श्री तुकामाई फार थोर व विलक्षण अधिकारी संतपुरुष होते. ते प्रत्यक्ष परमात्मस्वरुपच होते.
त्यांच्यापाशी अनन्यतेशिवाय दुसरा मार्ग नव्हता . ज्याला "मी" पणाचे थोडेतरी वारे आहे  त्याचे त्यांच्यापाशी जुळायचे नाही .अगदी विषयातल्या माणसाला बाहेर काढण्याचा
त्यांचा अधिकार होता. त्यांच्या गुरुपरंपरेतील प्रत्येक जण परमोच्च पदाला पोंचलेले होते . 

गोंदवले (बु.) ता.माण , जि.सातारा येथील या युगाचे नामावतारी प्रातःस्मरणीय श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज , श्री ब्रह्मचैतन्य हनुमंत महाराज
वावरहिरेकर
( ता.माण जि.सातारा ) , श्री रामजीबापू महाराज ( समाधीमठ येहळेगाव तु. , श्री उपेंद्रस्वामी , श्री रामानंद महाराज , उमरखेड ई.थोर - थोर विभूतींचे श्री तुकामाई सद्गुरु होत. 

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपले सद्गुरु श्री तुकामाईंबद्दल म्हणतात -- " माझ्या गुरुंनी मला नामच दिले. नामाशिवाय मी दुसरे साधन केले नाही.  एक गुरुआज्ञापालन
याशिवाय दुसरे काहीच मी केले नाही. मी त्यांना पूर्ण शरण गेलो. मला जे पाहिजे होते ते सर्व एकाच  ठिकाणीं - श्री तुकामाईंचे ठिकाणीं  - मला मिळाले. मला
निर्गुणाचा साक्षात्कार , सगुणाचे अलोट प्रेम आणि अखंड नाम एकत्र हवे होते , ते त्यांच्यापाशी मिळाले. माझे सर्व कार्य , गोंदवल्याचा हा सर्व व्याप , हे त्यांच्याच
कृपेचे फळ आहे. श्री तुकामाईंसारखे संत मिळणे फार कठीण आहे . त्यातल्या त्यात त्यांच्यासारखा गुरु मिळणे तर फार फार पुण्याईची गोष्ट आहे. ते प्रत्यक्ष परमात्मस्वरुपच
होते यात शंका नाही. त्यांच्या आज्ञेने मी वागतो. त्यांच्यासारखा दयाळू जगामध्ये कोण आहे ? त्यांना मनापासून शरण जावे. " अशा या परमपूज्य,
वंदनीय ,प्रातःस्मरणीय श्री तुकामाईंचे जीवनचरित्र आपण पाहू या .

श्री तुकाराम महाराजांचा जन्म :- 

कुर्तडी , ता.कळमनुरी , जि.हिंगोली येथे श्री काशीनाथपंत या नावाचे एक थोर तपस्वी , यज्ञयागी यजुर्वेदीय ब्राह्मण रहात होते. त्यांची दीनचर्या ऋषीप्रमाणे असून
ते अत्यंत निःस्पृह होते. त्यांना  स्वतःची जमीन होती व ते गावातील शाळेत शिक्षकही होते .

त्यांच्या पत्नी पार्वतीबाई ह्या गावातील सर्व जातीजमातीच्या व अडल्या - नडल्या गोरगरीबांना मदतीचा हात देत असत. लग्न होवून दहा - पंधरा वर्षे झाली
तरी मूलबाळ झाले नाही म्हणून पार्वतीबाईंनी तपश्चर्या आरंभिली .त्यांनी दिवसातून तीन वेळा स्नान , उपासतापास आणि जप करावा .तसेच त्यांनी  पीयूष व्रतही
धारण केले होते. श्री दत्त अवधूत हे त्यांचे आराध्यदैवत होते. अशी तीन वर्षे उपासना झाल्यानंतर एकदिवस त्यांच्या स्वप्नात श्री दत्तप्रभू प्रगट झाले व " मी तुझ्या पोटी
जन्म घेणार "असे सांगून ते गुप्त झाले. तसेच आणखी एका स्वप्नदृष्टांतात श्री रुक्मीणीमातेने त्यांच्या ओटीत पक्व आम्रफळ टाकले.
त्यांच्या साधनेचे फळ म्हणून त्यांना गर्भधारणा होवून फाल्गुन व. पंचमी ( रंगपंचमी ) शके १७३४ ( मार्च १८१२/ १३ ) रोजी सोमवारी  सूर्योदयास त्यांच्या माहेरी सुकळी
वीर ,ता.कळमनुरी ,जि.हिंगोली या गावी त्यांना पुत्ररत्न जन्मले .तेंव्हा बाळाच्या शरीराला मळ, रक्त ,गंध काहीही नव्हते. जन्मल्याबरोबर ते रडले तर नाहीच, उलट
त्याने स्मितहास्य केले. सुकुमार राजीव नेत्र, आजानुबाहु, कोमल मूर्ती पाहून सर्वजण दिपून जात होते. साक्षात् श्री शुकमुनीच जड - मूढांच्या उद्धारासाठी
अवतरले होते. 

पुत्रजन्मानंतर सर्वत्र आनंदी आनंद झाला . विपुल प्रमाणात अन्नदान, इच्छाभोजन, ब्राह्मण दक्षिणा आणि वस्त्रालंकार देवून सर्वांना संतुष्ट करण्यात आले. मुलाचे जातक
ऐकून त्याचे नांव "तुकाराम" असे ठेवण्यात आले .

बाललीला व इतर लीला :- 

श्री तुकामाईंच्या जन्मानंतर न्हाणी खोदण्यासाठी श्री काशीनाथपंत गेले असता खोदकामात त्यांना एक मोठा अवजड दगड लागला म्हणून ते गावातील दोघा - चौघांना
मदतीसाठी बोलावयास गेले. ईकडे श्री बाल तुकामाई आईच्या कुशीतून उठले व तो अवजड दगड त्यांनी लीलया बाजूला उचलून टाकला व परत पूर्वीसारखेच आईच्या
कुशीत येवून बसले. ही वार्ता सर्व सुकळी गावात वार्यासारखी हां हां म्हणता पसरली व त्या अवतारी बाळास पहाण्यासाठी खूप गर्दी जमली .

आईच्या कुक्षेतून बाळ उठला । नहाणीतला दगड उचलला ।।
तेथे बाजूला टाकला । 
बिलगला आईचे उदरी ।।

सुकळीत वार्ता पसरली ।
गावकरी बाया माणसे आली ।।
खूप गर्दी झाली । 
बाळरुपी देव पहावया ।।

( श्री चंद्रभानजी बंगळे यांची २५ अध्यायी पोथी ) 

शुक्ल पक्षाच्या चंद्राप्रमाणे बाळ वाढत होते. श्री तुकामाईंनी जन्मतःच विदेही अवस्था धारण केली होती व पूर्ण ज्ञान आणि वैराग्य आचरणात आणले   होते . ते
बालपणी तीन तीन दिवस दुग्धप्राशन करीत नसत. खाण्या - पिण्याची पर्वा नाही . मल मूत्रत्याग ई.कधी करीत तर कधी करीत नसत. पूजा अर्चा नाही , जातभेद
नाही. आई वडिलांनी अंगावर कपडे घातले की ते श्री तुकामाईंनी अंगातून काढून फेकून द्यावेत अथवा फाडून टाकून विदेही अवस्थेत रहावे. थंडी - उन - पाऊस - कशाचीच
बाधा नाही. अशा त्यांच्या एक एक लीला चालू होत्या .पंतांच्या संसारात आनंदी आनंद चालू होता . 

परंतु हा आनंद ईश्वराने जास्त दिवस टिकू दिला नाही .ज्या माऊलीने पुत्रप्राप्तीसाठी रात्रंदिवस ईश्वराचा ध्यास घेतला होता, तिला थोड्याशाच आजाराने ईहलोक सोडून
परलोकात जावे लागले . त्यावेळी श्री तुकामाई तीन - चार वर्षांचे  होते . त्यामुळे पंतांवर आणखी जबाबदारी वाढली .

श्री काशीनाथपंत विरक्त आणि घरामध्ये आई नाही , मग काय विचारता ! श्री तुकाराम दिवसभर खेळात असायचे. कुठे तरी खावे -  प्यावे व रात्री पडायला घरी यावे,
असा त्यांचा दिवस जाई. या ईश्वरावतारी बाळाचे खेळही विचित्रच होते. कधी नदीत पोहावे , पाण्यावर तरंगावे , किंवा पाण्यावर बसून रहावे असे ते लीलया करायचे.  

एकदा पावसाळ्याच्या दिवसात गावातील सर्व बाळगोपाळांसह श्री तुकामाई नदीकाठी खेळावयास गेले. नदीला पाणी थोडेच होते. सर्व मुलांनी मिळून नदीपात्रात
एक खड्डा खोदला व श्री तुकामाईंना त्यामध्ये लोटून दिले आणि वरतून वाळू - माती टाकून देवून तो खड्डा बुजवून टाकला. श्री तुकामाई मात्र खड्डयात आनंदाने निजानंदात
मग्न होऊन निर्धास्तपणे ध्यानस्थ बसून राहिले. ईतक्यात नदीला पुराच्या पाण्याचा एक फार मोठा लोंढा आला . बाकीची सर्व मुले पुराच्या भीतीने घाबरून तेथून गावात पळून आली.
पण बाळ श्री तुकाराम मात्र आपल्या खड्डयामध्येच ध्यानस्थ बसून राहिले . दिवस संपून अंधार पडला तरी मुलगा घरी आला नाही म्हणून श्री काशीनाथपंत काळजीत
पडले. चौकशीअंती जेंव्हा  त्यांना समजले की नदीला मोठा पूर आला असून बाळ तुकाराम खड्डयातच बसून आहे तेंव्हा ते अतिशय घाबरुन गेले व चिंताग्रस्त होवून गावकरी
आणि मुलांसह नदीकडे पळत पळतच निघाले . नदीवर आल्यानंतर मोठमोठ्याने त्यांनी " तुकाराम , तुकाराम "म्हणून हाका मारायला सुरुवात केली.  एवढ्यात
श्री तुकामाईंनी तात्काळ " ओ " दिली व पाण्यातून पोहत पोहत सुखरूपपणे नदीकाठावर आले. बाळ जवळ येताच पित्याने त्याला पोटाशी धरले. त्यांच्या डोळ्यांतून
आनंदाश्रू ओघळू  लागले. सर्व मंडळी अगदी चकित होवून गेली. श्री काशीनाथपंतांनी आपल्या मुलाचा अधिकार ओळखला. घरी आल्यावर त्यांनी विचारले, ' बाळ, 
तुला पाण्याची भीती वाटली नाही का ? तुझा जीव गुदमरला नाही का ? '  त्या पाच वर्षांच्या मुलाने उत्तर दिले , " नाही,  दादा ! मी तेथे आनंदात होतो.
प्राणनिरोध केल्यामुळे मला पाण्याचे अजिबात भय  वाटले नाही ! '  

ज्याठिकाणी ही विलक्षण लीला घडली , तेथील पाण्यात भाविक भक्तांनी श्रद्धेने अद्यापही बेलाचे पान टाकल्यास ते तळाशी जावून बुडते असे गावातील वयोवृद्ध जाणकार
लोक सांगतात. 

लहानपणीच श्री तुकामाईंनी शास्त्रोक्त पद्धतीने देवघरात एकदा देवपूजा केल्याचे काशीनाथपंतांच्या पहाण्यात आले असता त्याला नमस्कार करावा असा विचार पंतांच्या
मनात येताच बाळ श्री  तुकामाईंनी आपल्या पायाने पूजेतील देव लीलया फेकले . पूजेचे सर्व साहित्य अस्ताव्यस्त  झाले व तीर्थ सांडले ; म्हणून पंत त्यांच्यावर 
रागावलेसुद्धा . 

संकलन :- डॉ. डी.डी.देशमुख कामठेकर, पुणे . 

धन्यवाद. जय तुकामाई .