|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

लेख संग्रह

graphic footer
ब्र. श्री वासुदेवानंद स्वामी महाराज

ब्र. श्री वासुदेवानंद स्वामी महाराज , श्री चिन्मयमूर्ती संस्थान उमरखेड यांचे संक्षिप्त चरित्र 
....................

आज दिनांक २४-२-२०२३ , शुक्रवार ,  फाल्गुन शुद्ध पंचमी ; ब्र.श्री वासुदेवानंद  स्वामी महाराज, मठाधिपती, श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड यांची पुण्यतिथी. 
त्यांच्या श्रीचरणीं माझे कोटी कोटी प्रणाम. 

वाहे अमृतसिद्धी निर्झर अशी वाणी जयाची खरी । 
जिज्ञासू कुणी आर्त पाहूनी तया होई कृपा निर्भरी ।।
शिष्यांचा करण्या विकास श्रमणे ध्यानीमनी ध्यास हा । 
वासुदेव पदारविंद सुरसा, सेवो मनोभ्रंग हा ।। 

     श्री रामानंद महाराजांनंतर त्यांचे भाचे श्री वासुदेवानंद स्वामी  महाराज हे उमरखेड संस्थानचे मठाधिपती झाले . हे पूर्वाश्रमीचे श्री हरीभाऊ कावळे ( कुलकर्णी ), 
रा. कोंडूर,ता. कळमनुरी, जि. हिंगोली. पटवारगिरीमुळे त्यांच्या सरकार दरबारी चांगल्या ओळखी होत्या. ते कुशल व्यवस्थापक होते. त्यांचा शिष्यसंप्रदाय खूप वाढला. 
त्यांनी उमरखेड , येहळेगाव, मरडगा, हिंगोली, करंजाळा येथील मठ व मंदिरांसाठी जमीनी खरेदी करून संस्थानच्या उत्पन्नात भर टाकली. बर्याच शिष्यांनीही 
गावोगावी संस्थानला जमीनी अर्पण केल्या. 

सच्चित्ते स्मरतां सदा गुरुपदा ते भोगही संपती ।
तारा श्री यतिवर्यस्वामी मजशी मी लीन हो त्वत्पदीं ।
वारा ताप दयानिधे छळिती हो  हे षड्रिपु जीव हा ।
वासुदेव पदारविन्द सुरसा सेवोमनोभ्रंग हा ।।

श्री वासुदेवानंद स्वामी महाराजांनी येहळेगाव मठाच्या सभामंडप, पाकशाळा आणि बारवाचे काम करून गावात बर्याच जागाही खरेदी केल्या.

नंदादीप असे तुम्ही उजळिला अध्यात्म वेदान्त नि ।
श्री गोचर संतपरंपरा टिकविली , फडके ध्वजा भूवनीं ।।
भक्तोद्धारी कृपाघना यतिवरा देवाधिदेवा महा ।
वासुदेव पदारविन्द सुरसा सेवो मनोभ्रंग हा ।।

संस्थानतर्फे दरवर्षी ज्येष्ठ व. एकादशीला पंढरीच्या वारीला मठाधिपती हे सोबत ब्रह्मवृंद, शिष्यमंडळी यांना घेऊन जात असतात. 
पंढरपूर येथे जागेची अडचण भासू लागली. तेंव्हा श्री वासुदेवानंद स्वामी महाराजांनी पंढरपूर येथे गोविंदपुर्यात चंद्रभागातिरी एक 
मोठा वाडा खरेदी करून सर्वांचीच तेथे  थांबण्याची सोय केली. 

वाटे सर्वही ब्रह्मवृंद ज्यांना प्रत्यक्षचि ईश्वर ।
भेदा थोर न राव रंक वसली श्रद्धान्नदानावर ।
ज्यांच्या केवळ दर्शनेंचि हरती व्याधी अति दु:सहा ।
वासुदेव पदारविन्द सुरसा सेवोमनोभ्रंग हा ।।

 श्री वासुदेवानंद स्वामी महाराजांच्या  आशीर्वादामुळे अनेक निपुत्रिकांना संतानप्राप्ती झाली. त्यांनी नदीत बुडणाऱ्या शिष्याचे प्राण वाचविले. 
त्यांनी एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या गावांना पुडीसाठी उपस्थित रहाण्याचा चमत्कार केला आहे. श्री स्वामींनी श्री भगवानराव 
देशमुख सिरसाळकर ( प.पू.श्री वामनानंद महाराज ) यांना विरसणी येथे त्यांच्या वयाच्या अकराव्या-- बाराव्या वर्षी उपदेश दिला 
आणि ते  त्यांना उमरखेडला घेवून आले. त्यांना प्रवासात सोबत ठेवून त्यांचेकडे श्रीविश्वंभर देवतेची  पूजा सोपवली. 

दया- क्षमा - शांतिरुपे त्रय अशी आपुली असे अर्चना ।
सिद्धि- बुद्धीश्वरा प्रभो ! यतिवरा द्या आश्रया या दीना ।।
देवाहूनी श्रेष्ठ सद्गुरु अशी महती असे हो महा ।
वासुदेव पदारविन्द सुरसा सेवोमनोभ्रंग हा ।।

श्रीवासुदेवानंद स्वामींनी आपल्या हयातीतच श्री लिंबाजी नाईक नेब (प.पू. श्री पुरुषोत्तमानंद महाराज ) यांच्याकडे मठाधिपतीची 
सूत्रे सोपवली. त्यानंतर ते आठ वर्षे हयात होते. 

श्रींची दिव्य परंपरा ब्रीद असे ती चालवी साधना ।
अधिकारी करिती नियुक्त गुरुजी घेता चतुर्थाश्रमा ।।
चरणीं लीन सदा प्रभो ! यतीश्वरा पुरुषोत्तमानंद हा ।
वासुदेव पदारविन्द सुरसा सेवोमनोभ्रंग हा ।।

श्री वासुदेवानंद स्वामी  महाराज फाल्गुन शु. पंचमी शके १८८५ रोजी अनंतात विलीन झाले. त्यांना मार्लेगावजवळ 
पैनगंगातिरी जलसमाधी देण्यात आली. 

श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं माझे कोटी कोटी प्रणाम. 

देई ठाव अता त्वरें चरणीं बा ! दासासि या ईश्वरा ।
कर्माघांतचि लोटि ना , करि कृपा नाथा ! दयासागरा ।
भवपाशीं गुंतुनि बहु शिणतसें , चंचल असे जीव हा ।
वासुदेव पदारविन्द सुरसा सेवोमनोभ्रंग हा ।।

श्री औदुंबरग्राम स्वर्ग दुसरे भासे जनां भूवरी ।
जेथे चिन्मयमूर्तीचा मठ असे त्या रम्य पीठावरी ।।
झाले सद्गुरु शांतदांत सुमति ब्राह्मण्य भक्तार्ति हा ।
वासुदेव पदारविन्द सुरसा सेवोमनोभ्रंग हा ।।

संकलन :- डॉ. डी. डी. देशमुख कामठेकर, पुणे . 

धन्यवाद. चिन्मयानंद महाराज की जय.