|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

लेख संग्रह

graphic footer
श्री शिवरामानंद महाराज

आज मार्गशीर्ष कृ.१४ ,गुरुवार ,दिनांक २२-१२-२०२२ .आज ब्र.प.पू.श्री शिवरामानंद महाराज ,मठाधिपती , 
श्री चिन्मयमूर्ती संस्थान उमरखेड यांची पुण्यतिथी आहे .त्यांच्या श्रीचरणीं माझे कोटी कोटी प्रणाम.

भक्ती ज्याने केली मारुतीसमान ।
जनसेवा करी मातेसमान ।।
संन्यास घेतला , गादीचे भूषण ।
शिवरामानंद हे नामाभिधान ।।

( श्री अशोकराव उपाध्ये, औरंगाबाद ) 

श्री सच्चिदानंद महाराजांनंतर श्री शिवरामानंद महाराज हे श्री चिन्मयमूर्ती संस्थान उमरखेडच्या पीठावर विराजमान झाले. हे सच्चिदानंद स्वामींच्या शिष्यांपैकी मुख्य होते.
हे पूर्वाश्रमीचे शिवराम साकबरे ( ताकबटे ) , रा. मालेगाव ( ता.वसमत ) . ते मठात सर्व भक्तांची सेवा , आजार्यांची शुश्रूषा आईच्या ममतेने मनोभावें करीत
असत. रोग्यांचे मल, मुत्र, पू, अळ्या इ. काढून स्वच्छ करणे, औषधी देणे , मठाची झाडझूड करणे ,प्रसंगी नाल्या साफ करणे आणि दिवसभर गावातील सर्व
मंदिरात पूजा करीत फिरणे, असा त्यांचा दिनक्रम होता. 

बाल श्री शिवराम श्रीगोचरस्वामींच्या ( श्री सहजानंद महाराजांच्या ) सोबतच उमरखेडला आले आणि तेथेच मठातील सेवेत रमून गेले. त्यांचा पोषाख साधा असे. एक
धोतर नेसून दुसरे एक धोतर अंगावर घेत व खांद्यावर एक पंचा असे. याशिवाय त्यांच्याजवळ हिवाळ्याशिवाय कधीच दुसरे कपडे नसत. 

त्यांची दिनचर्या म्हणजे ते सकाळी स्नान करून धाबळे नेसत. संध्या, जप करून, कपाळाला भस्माचा पट्टा लावून गावातील देवतांच्या पूजा करायला निघत.एका
कळशीत पाणी भरून त्यात बेलाची पाने टाकत . कळशीवर गंधाक्षतांची तबकडी ठेवून पूजा करण्यास निघत. मठातील समाधीपूजन आटोपल्यावर 
माळावरील श्री तुकाबाई,श्री रेणुकादेवी , श्री महाकाली, श्री आदिनाथ साधु महाराज , श्री राममंदिर, शनिवारी श्री विशाचा मारुती
मंदिर अशा सर्व ठिकाणी पूजा आटोपल्यानंतर सायंकाळी
सहा वाजता मठात येत असत. त्यांचे जेवणाचे पान दुपारीच वाढून ठेवलेले असे. मठात आल्यावर ते जेवण करत. पात्रातील सर्व अन्न ग्रहण करीत. 
कमी पडल्यास मागायचे नाही वा जास्त वाढले म्हणून टाकून द्यावयाचे नाही.ते एकभुक्त होते. जेवण झाल्यावर धोतर नेसून अंथरुणावर पडत व 
थकव्यामुळे लगेच निद्राधिन होत. त्यांचा हा क्रम संन्यास घेईपर्यंत अविरतपणे चालू होता. 

मठाधिपती श्रीसच्चिदानंद स्वामी आता थकले होते. त्यांनी आपला स्वतःचा काळ संपत आला हे जाणून, शके १८१४ मध्ये श्री शिवरामानंद महाराजांना संन्यासदीक्षा 
दिली.आता त्यांचे नाव श्री शिवरामानंद स्वामी असे ठेवण्यात आले.श्री सच्चिदानंद स्वामी समाधिस्थ झाल्यावर वैशाख व. षष्ठी शके १८१४ ला श्री शिवरामानंद 
स्वामी मठाधिपती झाले. जरी हे गादीवर बसले तरी ते गुरुसेवेतच रममाण असत. त्यांनी पूर्वाश्रमात एका पैशाचाही व्यवहार केलेला नसल्यामुळे मठात श्री रावसाहेब 
देशपांडे सेवलीकर हेच सर्व कारभार पहात असत. कुलमुख्त्यार नेमण्याची प्रथा या वेळेपासूनच सुरु झाली. 

श्री शिवरामानंद स्वामींनी संन्यास ग्रहणानंतर नामसंकीर्तनाकडे जास्त लक्ष देवून असंख्य भक्तांना सन्मार्गाकडे वळविले. प्रवासात एकदा वाशिमच्या जुन्या
श्री व्यंकटेशाच्या देवळाजवळ त्यांची व थोर संत श्री नाथ नंगे महाराजांची भेट झाली. दोघे एकमेकांना कडकडुन भेटले. दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू ओसंडत होते. 

शके १८२३ च्या मार्गशिर्षाच्या शुद्धात श्री शिवरामानंद महाराज श्री विठ्ठल किंकर महाराजांच्या उत्सवाकरिता पुसदला गेले असता तेथे ज्वराने आजारी पडले. 
त्याच स्थितीत ते उमरखेडला परत आले. येथे प्रकृती जास्तच बिघडली. वय ८० वर्षाच्या वर गेले होते. वृद्धापकाळाने प्रकृती विकोपास जावून मार्गशीर्ष व. चतुर्दशीला 
त्यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला व ते कैवल्य स्थितीस प्राप्त झाले. उमरखेड जवळील मार्लेगाव येथे पेनगंगा नदीत त्यांना जलसमाधी देण्यात आली. त्यांच्यानंतर
श्री नित्यानंद महाराज गादीवर बसले.

चिन्मयानंद महाराज की जय.

संकलन :- डॉ.डी.डी.देशमुख कामठेकर , पुणे .

धन्यवाद. चिन्मयानंद महाराज की जय.