|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

लेख संग्रह

graphic footer
श्री चिन्मयमूर्ती संस्थान उमरखेडचे आराध्यदैवत श्री विश्वंभर देवता

आदिनाथ गुरू सकल सिद्वांचा ।
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।।
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला ।
गोरक्ष वळला गहिनीप्रती ।
गहिनीप्रसादे निवृत्ती दातार ।।
जोजविले सार ज्ञानदेवा ।

श्री चिन्मयमूर्ती संस्थान उमरखेडची गुरुपरंपरा ही महान अशी नाथपरंपरा आहे .आदिनाथ - मत्स्येंद्रनाथ - गोरक्षनाथांपासून ते श्री चिन्मयानंद महाराज 
आणि त्यांच्यापासून ते विद्यमान संस्थानाधिपती प.पू.श्री माधवानंद महाराजांपर्यत ही गुरुपरंपरा आजपर्यंत अविरतपणे , अव्याहतपणे भक्त आणि 
शिष्य मंडळींच्या केवळ कल्याणासाठीच अवतरली आहे . ज्ञान आणि भक्तीचा अपूर्व असा सुरेख संगम या नाथपरंपरेत पहावयास मिळतो. 

" सहज बोलणे हाचि उपदेश " हे या गुरुपरंपरेचे तत्व असून , " शिष्यांचा करण्या विकास श्रमणे " हाच या गुरुपीठाचा ध्यानी - मनी ध्यास आहे . 
अशा या श्रेष्ठ गुरुपरंपरेचे आराध्य दैवत हे स्फटिकरुपी द्वादश ज्योतिर्लिंगस्वरुपी स्वयंभू श्री विश्वंभर भगवंत आहेत . या श्री विश्वंभर देवतेचे दररोज 
नियमितपणे पूजन , अर्चन आणि उपासना या संस्थानात विद्वान ब्रह्मवृंदांद्वारे रुद्राभिषेकाद्वारे केली जाते .विद्यमान मठाधिपती 
प.पू.श्री माधवानंद महाराज उमरखेड बाहेर दौर्यावर असतांना आपल्या सोबत हे श्री विश्वंभर देव घेऊन जातात.
तसेच विद्वान ब्रह्मवृंदही समवेत असतात .दररोज पुडीच्या यजमानाकडे दुपारच्या आरतीच्या वेळी व सायंकाळी प्रदोष पूजेच्या वेळी 
प.पू. श्री माधवानंद महाराजांच्या पावन उपस्थितीत श्री विश्वंभर देवतेच्या लिंगदर्शनाचा कार्यक्रम संपन्न होत असतो व यावेळी या कार्यक्रमासाठी 
मुद्दाम असंख्य भक्तगण बहुसंख्येने उपस्थित राहून दर्शन घेतात व कृतार्थ होतात.स्फटिकाच्या गोलात यावर द्वादश ज्योतिर्लिंगांचे बारा ठिपके आहेत.

या श्री विश्वंभर देवतेची कथाही विलक्षण अद्भुत आहे .श्री चिन्मयानंद महाराजांचे ब्रह्मा - विष्णू - महेश स्वरुपी तीन महान अवतारी शिष्य होते.
एक - श्री सहजानंद महाराज तथा श्री गोचरस्वामी , उमरखेड , जि.यवतमाळ . हे श्री चिन्मयानंद महाराजांचे उत्तराधिकारी होते आणि यांनीच 
आपले गुरु श्री चिन्मयानंद महाराजांच्या महासमाधी ग्रहणानंतर त्यांच्याच उमरखेडच्या रहात्या वाड्यात त्यांच्या समाधीची स्थापना करून 
"श्री चिन्मयमूर्ती संस्थान उमरखेड " ची मुहूर्तमेढ रोवली . 

दुसरे - श्रीमत् परमहंस श्री तुकाराम महाराज ( श्री ब्रह्मानंद महाराज , श्री तुकामाई ) , येहळेगाव तुकाराम , ता.कळमनुरी , जि. हिंगोली 
आणि तिसरे - श्री पूर्णानंद महाराज , शेवाळा , ता. कळमनुरी जि. हिंगोली .

श्री सहजानंद महाराज ( श्री गोचरस्वामी ) हे श्री क्षेत्र काशी येथे गेले होते . ते महान शिवभक्त असून दररोज नियमाने आपल्या हातावर वाळूचे 
शिवलिंग स्थापन करून त्याचे अत्यंत मनोभावाने पूजन - अर्चन करीत असत. 

असेच एक दिवस ते काशीक्षेत्री गंगा नदीच्या तीरावर दशाश्वमेध घाटावर शिवलिंगाचे पार्थिव पूजन करीत बसले असतांना , तेथील एक संन्यासी 
त्यांना म्हणाले - " संन्याशांनी पार्थिव पूजन करणे धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे " ,- असे म्हणून त्यांनी श्री सहजानंद महाराजांच्या हातावरील ते 
पार्थिव शिवलिंग आपल्या हाताने ढकलून देवून गंगेत टाकून दिले .तो काय चमत्कार ! लगेचच दुसरे पार्थिव शिवलिंग श्री सहजानंद महाराजांच्या 
हातावर आपोआप प्रकट झाले .त्या संन्याशांनी श्री सहजानंद महाराजांच्या हातावरील शिवलिंग गंगेत टाकून द्यावे आणि पुन्हा पुन्हा तसेच दुसरे 
शिवलिंग आपोआप श्री सहजानंद महाराजांच्या हातावर प्रकट व्हावे ! असा प्रकार १०७ वेळा घडला .शेवटी प्रत्यक्ष भगवान आशुतोष श्री काशी विश्वनाथ 
भगवंत श्री सहजानंद महाराजांच्या समोर प्रकट झाले आणि त्यांना प्रत्यक्ष दर्शन देवून , भगवंतांनी स्वामींच्या नित्य पूजन - अर्चनासाठी म्हणून आपले 
आत्मलिंगच - हेच ते स्वयंभू असे स्फटिकरुपी द्वादश ज्योतिर्लिंगस्वरुप श्री विश्वंभर देवता - श्री सहजानंद महाराजांच्या हातावर ठेवले आणि 
श्री काशी विश्वनाथ भगवान अंतर्धान पावले . तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनीच श्री विश्वंभर देवता आणि श्री सहजानंद महाराजांचा मोठ्याने 
जयजयकार केला . या अगोदर सांगितल्याप्रमाणे विद्वान ब्रह्मवृंदांद्वारे दररोज नियमितपणे रुद्राभिषेकाद्वारे या श्री विश्वंभर देवतेचे पूजन - अर्चन केले जाते .

गोचरस्वामी करी अन्नदान ।
गुरुभक्ती ज्यांची शुक्र कचासमान ।।
औदार्य ज्यांचे कर्णासमान ।
वंदू तया गोचरा पुण्यवान ।।

श्री चिन्मयमूर्ती संस्थान उमरखेडच्या नाथपंथीय गुरुपीठास , श्री विश्वंभर देवतेस आणि सर्व वंदनीय गुरु महाराजांच्या श्रीचरणीं माझे कोटी कोटी प्रणाम .
.............................................

संकलन :- डॉ. डी.डी.देशमुख कामठेकर , औरंगाबाद .

धन्यवाद .चिन्मयानंद महाराज की जय .
.............................................