|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

लेख संग्रह

graphic footer
श्रीमत् परमहंस श्रीतुकाराम महाराज येहळेगांव, ता.कळमनुरी जि.हिंगोली.

 येहळेगांव येथे वास्तव्य ज्यांचे।
प्रख्यात शिष्य गुरू चिन्मयांचे।।
विदेही स्थितीने जगी वर्तताहे।
तुकाराम साधु जिवन्मुक्त आहे।।

श्री काशिनाथपंत व पार्वतीबाई या दांपत्याच्या पोटी शुकावतार की दत्तावतार , श्री तुकामाई फाल्गुन व.५ ( रंगपंचमी) 
शके १७३४ रोजी आपल्या आजोळी सुकळी ( वीर) ता.कळमनुरी येथे अवतरले.
श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, श्री ब्रह्मचैतन्य हनुमंत महाराज( वावरहिरे, ता.माण, जि.सातारा) , 
प.पू.श्री रामजीबापू ( येहळेगांव) , नर्मदाबुवा आदी थोर विभूतींचे श्रीतुकामाई सद्गुरू होत.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जे ब्रह्मनिष्ठ सत्पुरुष भारतामध्ये  होते त्यांच्यापैकी एक विलक्षण योगिराज व अतिथोर
 महात्मा म्हणजे श्रीतुकामाई.मूर्तीमंत विरक्ती, शांती व आनंद , असे तुकामाईंचे वर्णन करता येईल.
वरवर वेडेपणाचे सोंग धारण करणार्या या आपल्या सद्गुरूंबाबत या युगाचे महान नामावतारी प.पू.श्री ब्रह्मचैतन्य 
गोंदवलेकर महाराज म्हणतात.....मला निर्गुणाचा साक्षात्कार, सगुणाचे अलोट प्रेम आणि अखंड नाम एकत्र हवे होते, ते त्यांच्यापाशी
 मिळाले.श्रीतुकामाई फार थोर होते, प्रत्यक्ष परमात्मस्वरुपच होते.मी त्यांना शरण गेलो, माझा मी उरलो नाही. माझे सर्व कार्य,
 गोंदवल्याचा हा सर्व व्याप हे त्यांच्याच कृपेचे फळ आहे.त्याकाळच्या मोठमोठ्यांना तुकामाईंची योग्यता कळली नाही. त्यांच्यासारखा 
दयाळू जगामध्ये कोण आहे? त्यांना मनापासून शरण जावे. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची मराठवाडा- विदर्भातील शिष्यपरंपरा 
म्हणजे......आनंदसागर महाराज व श्री रामानंद महाराज, जालन,-- श्रीप्रल्हाद महाराज साखरखेर्डा.

श्रीतुकामाईंनी विलक्षण लीला व असंख्य चमत्कार करून निपुत्रिकांना संतानप्राप्ती, निर्धनांना धनप्राप्ती, मरणोन्मुख जर्जर व्याधीग्रस्तांना 
आरोग्यप्राप्ती व जीवनदान, मुमुक्षुंना मोक्षप्राप्ती आपल्या कृपाशीर्वादामुळे प्राप्त करुन दिली व असंख्य भक्तांचा उद्धार केला. 
आजही याची प्रचिती येते.

शेवटी या महात्याने येहळेगांव येथे ज्येष्ठ शु.८ शके १८०९ रोजी महासमाधीग्रहण केले. येथे त्यांचा समाधीमठ व मंदिर असून पुण्यतिथी
 उत्सवासह ईतर उत्सव- महोत्सव दरवर्षी साजरे केले जातात.
( संदर्भ....श्रीतुकामाई चरित्र, पाचवी आवृत्ती .लेखक....डॉ.डी.डी.देशमुख, कामठेकर, औरंगाबाद.मो.९८५०७४३९२०, ७५८८६४३१२०) 
संकलन....डॉ.डी.डी.देशमुख, कामठेकर, औरंगाबाद. 

जो कुछ है, सो तूही है।
श्रीतुकामाई समर्थ, जय जय तुकामाई समर्थ.।।