|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

लेख संग्रह

graphic footer
श्रीचिन्मयमूर्ती संस्थान उमरखेडची गुरुपरंपरा

श्रीचिन्मयमूर्ती संस्थान , उमरखेड( जि. यवतमाळ) ची गुरुपरंपरा ही नाथपरंपरा असून या परंपरेत योग व भक्ती 
यांचा सुरेख संगम झाला आहे. या संस्थानास दोन शतकांचा इतिहास असून संक्षिप्तपणे ही गुरुपरंपरा पुढीलप्रमाणे आहे.........

आदिनाथ-मत्स्येंद्रनाथ( मीननाथ) - गोरक्षनाथ- मुक्ताबाई- चांगा वटेश्वर- चक्रपाणी- विमलानंद- चांगा केशवदास- 
जनकराज- नृसिंह- ह्रदयानंद- विश्वेश्वर- केशवराज- बोपया- हरिदास - कान्हया - सदानंद - कृष्ण - श्यामसुंदर - 
अनंत - प्रल्हाद - नागया - एकनाथ नाना - विठ्ठलकिंकर - चिन्मयानंद .

श्रीचिन्मयानंद महाराजांचे ब्रह्मा , विष्णू व महेशस्वरुपी तीन अवतारी शिष्योत्तम म्हणजे -- श्रीसहजानंद महाराज
 ( गोचरस्वामी , उमरखेड) , श्रीतुकामाई ( ब्रह्मानंद महाराज , येहळेगांव ) आणि श्रीपूर्णानंद महाराज ( शेवाळा ) हे होत.
श्रीचिन्मयानंद महाराजांच्या महासमाधीग्रहणानंतर त्यांचे उत्तराधिकारी श्रीसहजानंद महाराज यांनी त्यांच्याच उमरखेड 
येथील राहत्या वाड्यात त्यांच्या समाधीची स्थापना करून श्रीचिन्मयमूर्ती संस्थान उमरखेड ची मुहूर्तमेढ रोवली.

या गुरुपरंपरेत विद्यमान मठाधिपती हे त्यांच्या इच्छेनुसार योग्य अशा अधिकारी पुरुषाची मठाधिपती म्हणून निवड करतात .
मठाधिपतींची सूत्रे ग्रहण करण्यापूर्वी विधीपूर्वक संन्यासदिक्षा घेणे बंधनकारक असते. स्वामी सहजानंदांनंतर - सच्चिदानंद- 
शिवरामानंद - नित्यानंद - रामानंद- वासुदेवानंद - पुरुषोत्तमानंद - वामनानंद - माधवानंद ( प्रचलित विद्यमान मठाधिपती ) 
अशी ही गुरुपरंपरा आहे.

श्रीसहजानंद स्वामींच्या हातावर काशीक्षेत्री प्रगट झालेल्या द्वादश ज्योतिर्लिंगस्वरूप  श्रीविश्वंभर भगवंताचे दररोज पूजन, 
अर्चन व विद्वान ब्राह्मणांद्वारे रुद्राभिषेक करून या संस्थानमध्ये उपासना केली जाते. सेवा, अन्नदान, नित्यकर्म, भजन- पूजन,
नामस्मरण यावर संस्थानचा भर असून  सहज बोलणे हाचि उपदेश  हे तत्व आहे.  शिष्यांचा करण्या विकास , श्रमणे  हाच 
ध्यानी- मनी ध्यास आहे. नामस्मरण , भागवत धर्म , वारकरी संप्रदाय , श्रीविश्वंभर व श्रीपांडुरंगाची कास धरून सर्वसामान्यांपासून
 ते सर्वांच्याच कल्याणाची तळमळ असलेल्या , दीनदुबळ्या जनांच्या उद्धारासाठीच अवतरित झालेल्या श्रीचिन्मयमूर्ती संस्थान , 
उमरखेडच्या आध्यात्मिक ख्यातीच्या मठाधिपतींची ही दिव्य संतपरंपरा आहे. नि:स्पृहतेची, सत्याची आणि भक्तीची ही जी 
अमृतवेल श्रीचिन्मयानंद महाराजांनी लावली, ती वेल आता विद्यमान मठाधिपती प.पू.श्रीमाधवानंद महाराजांनी गगनावर नेली आहे. 
संस्थानांतर्गत उमरखेड व येहळेगांव मठांव्यतिरिक्त अधिनस्त इतर सर्व मठ व मंदिरे यांचा नवीन बांधकाम व जिर्णोद्वाराद्वारे कायापालट
 केला असून भक्तांच्या नि: शुल्क निवास व भोजनप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. उमरखेड येथे वेदपाठशाळा कार्यरत
असून संस्थानातर्फे दरवर्षी उमरखेड व येहळेगांव मठात सामूहिक मौंजींचे आयोजन केले जाते .

श्रीचिन्मयमूर्ती संस्थानची मूळ नाथपंथीय असणारी ही विशाल व दिव्य सद्गुरू ज्ञानपरंपरा पुढे भक्ती- ज्ञानपरंपरेने वारकरी, रामदासी ,
हरदासी , किर्तन परंपरेत एखाद्या महासागराप्रमाणे प्रवाहित झाली आहे. याच गुरुपरंपरेतील परमहंस जीवनमुक्त थोर योगी श्रीतुकामाई
 यांच्याद्वारा अनुग्रहित थोर नामावतारी श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, श्रीब्रह्मचैतन्य हनुमंत महाराज वावरहिरेकर ( जि. सातारा ) , 
श्री रामजीबापू (  येहळेगांव ) , श्रीउपेंद्रस्वामी , तसेच श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य जालन्याचे श्री आनंदसागर महाराज व 
श्री रामानंद महाराज, श्रीरामानंद महाराजांचे शिष्य प्रात : स्मरणीय श्रीप्रल्हाद महाराज ( साखरखेर्डा ) , श्रीसहजानंद महाराजांचे शिष्योत्तम 
दत्तावतारी श्री रंगनाथ महाराज ( आनंदी आत्मानंद सरस्वती , नाव्हा , ता.जि. जालना ) , श्रीशंकरानंद महाराज, केसापुरी ( जि.बीड ) , 
श्री रंगनाथ महाराजांचे शिष्योत्तम व उत्तराधिकारी श्री श्वासानंद महाराज, मेहकर ( समाधीमठ काशी ) , सदानंद महाराज ( धारकल्याण ,
जि. जालना ) , श्री आनंदीमाई ( नाव्हा ) , श्रीपूर्णानंद महाराज , शेवाळा यांचे थोर शिष्य श्री आप्पाजी महाराज , पाटणबोरी , श्रीनित्यानंद 
महाराजांद्वारे संन्यासदिक्षा ग्रहण केलेले श्रीविष्णूदास महाराज  ( माहूर ) आणि श्री वामनानंद महाराजांद्वारे अनुग्रहित थोर विभूति श्री 
ज्ञानेश्वर महाराज माऊली , ( चाकरवाडी , जा.बीड ) अशा काही थोर- थोर संत- महात्म्यांचा नामोल्लेख करणे अनिवार्य ठरल .

अशा या थोर श्रीचिन्मयमूर्ती संस्थानला फार उच्च व आध्यात्मिक गुरुपरंपरा प्राप्त असून , या गुरूपीठाद्वारे आपल्या संस्कृतीचे, 
वेदविद्येच्या जतनाचे आणि सुसंस्कृत समाज निर्माण करण्याचे महान कार्य अविरतपणे चालू आहे . या गुरुपीठाचे हजारो- लाखोंनी 
शिष्य व भक्त असून , सर्वांना सोप्या व सुलभ अशा भक्तीमार्गास लावून त्यांचा आध्यात्मिक विकास व उद्धार करण्याचे कार्य या 
 श्री चिन्मयमूर्ती गुरूपीठास माझे कोटि कोटि प्रणाम.

पुण्यशील आमुची औदुंबर ही नगरी । 
नांदतो तिथे नित भक्तांचा कैवारी ।। 
नाम धारण करूनि सार्थची चिन्मयस्वामी ।
गुरुपरंपरा ही चालवितो निष्कामी ।। 

चिन्मयानंद महाराज की जय 
संकलन.....डॉ.डी.डी.देशमुख , कामठेकर, औरंगाबाद . मो. ९८५०७४३९२० , ७५८८६४३२० .