|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

लेख संग्रह

graphic footer
संतश्री रामजीबापू महाराज ( समाधी मंदिर येहळेगाव तु. , ता.कळमनुरी जि.हिंगोली ) यांचे संक्षिप्त चरित्र

असो या जगी सर्व साधु वरिष्ठ । तुकाराम ध्यानी सदा एकनिष्ठ ।।
गुरुसन्निधी ठेवी जो या तनुला । असो वंदना रामबापू पदाला ।। 

आज आषाढ शु.८, गुरुवार , दिनांक ७.७.२०२२ . आज प.पू.श्री रामजीबापू महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या श्रीचरणीं माझे 
कोटी कोटी प्रणाम .

 प.पू.संतश्री गुरु रामजीबापू महाराज हे श्रीतुकामाईंचे पट्टशिष्य  होत. यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा नदीच्या काठी असलेल्या झाडगावच्या 
 श्री हनुमंतराव शिंदे व गहेनीबाई यांचे ते सुपुत्र होते. श्री तुकामाईंच्या आशिर्वादामुळे गहेनीबाईंना शके १७७० 
मध्ये मार्गशीर्ष शु. षष्ठीला रविवारी पुत्ररत्न जन्मले. तेच हे श्री रामजीबापू महाराज होत . 

 श्री रामजीबापू महाराज आपल्या आईवडिलांबरोबर बालपणापासूनच दर सोमवारी येहळेगावला श्री तुकामाईंच्या दर्शनास येत असत.
 त्याकाळच्या रूढीप्रमाणे बापूंचे लग्न वयाच्या दहाव्या वर्षीच झाले.ते शेतीच्या कामात वडिलांना मदत करीत ,पण अंतर्यामी विरक्तच होते. 
त्यांना ईश्वर दर्शनाची तळमळ लागली होती. 

एकदा बापू सोमवार ऐवजी रविवारीच श्रीतुकामाईंच्या दर्शनाला निघाले असता वडिलांनी त्यांना टोकून म्हटले की , " अगोदर शेतात कापून 
 ठेवलेल्या करडीचे खळे कर व मग उद्या वारीला जा." श्री गुरु रामबापू महाराज रात्रीच्या राखणीला शेतात आले व आसपास कोणी नाही
असे पाहून त्यांनी शेतातील संपूर्ण करडीला स्वतःच आग लावून दिली. व घरी येवून वडिलांना सांगितले की , " करडी 
सगळी जळून गेली आहे. आता मी येहळेगावला जातो ." यावर वडिलांना राग अनावर झाला व '' माझ्या येथून तोंड काळे कर . पुन्हा घरी येवू नको '' 
असे रागाच्या भरात ते बापूंना बोलले. हीच आज्ञा शिरसावंद्य मानून बापू थेट येहळेगावला श्री तुकामाईंकडे आले व त्यांच्या चरणावर लोटांगण घातले.
त्याचवेळी श्री तुकामाईंनी त्यांना अनुग्रह देवून कृतार्थ केले व त्यांना अनुग्रह देण्याचा अधिकारही प्रदान केला. बापूंनी श्री तुकामाईंच्या 
अनुज्ञेने त्यांच्या जन्मगावी ( आजोळी ) सुकळीला सिंहासन बांधून त्यावर तेथे मल्हारी धनगराच्या घरात सापडलेल्या 
श्री तुकामाईंच्या वार व पादुकांची स्थापना केली आणि नियमितपणे 
उपासना व उत्सव - महोत्सव सुरू केले . येथे श्री तुकामाईंचा जन्मोत्सव दरवर्षी रंगपंचमीला मोठ्या थाटाने साजरा केला जातो . 
एकदा असा चमत्कार घडला की या उत्सवात पाळण्यात ठेवलेल्या प्रतिकात्मक बालकाच्या रडण्याचा आवाज सर्वांना ऐकू आला. 

संतश्री रामजीबापू महाराजांचे अनेक दिव्य अनुभव त्यांच्या भक्तांना आलेले आहेत. असंख्य भक्तांना त्यांनी परमार्थाकडे
वळवून त्यांचा उद्धार केला. 

श्री गुरु रामजीबापू महाराजांनी श्री तुकामाईंच्या आज्ञेनुसार आपले वस्तीस्थान येहळेगावला श्रीतुकामाईंच्या मठाजवळ 
तळ्याजवळील स्मशानात बांधले. त्यांचा समाधी मठ येथेच त्यांच्या रहात्या वाड्यात आहे. श्री बापूंनी आषाढ शु. अष्टमीला शके १८५० मध्ये 
देह ठेवला. येथे त्यांची पुण्यतिथी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. यावेळी त्रिकाळ पूजा , 
भजन -- किर्तन , भागवत सप्ताह व विपुल अन्नदान होते. त्यांचे वंशज या मठाची व्यवस्था पहातात .

असो येहळेगांवी हो संतख्याति ।
तुकामाय सेवा ईशभक्ती ।।
गुरुच्या कृपेने जया लाभ झाला ।
नमूं मंदिरीं रामबापू पदाला ।।

संकलन :- डॉ. डी.डी.देशमुख कामठेकर , औरंगाबाद .

धन्यवाद . संतश्री रामजीबापू महाराज की जय .