|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

पन्नास माणसांच्या स्वयंपाकात चारशे माणसे जेवली

graphic footer

एकदा पुसद येथील श्रीतुकामाईंचे परमभक्त पांडुरंगपंत देसाई आणि त्यांच्या पत्नी गंगूबाई यांनी तुकामाईस नैवेद्यासाठी भक्तिभावाने निमंत्रित केले. श्रीतुकामाईंनीही त्या निमंत्रणाचा स्वीकार केला. गंगूबाईने पन्नास माणसांचा स्वयंपाक तयार केला. निमंत्रणाप्रमाणे इतर मंडळी वेळेवर आली; पण श्रीतुकामाईंचा पत्ताच नव्हता. सर्वत्र शोध केला पण गुरुमाऊलींचा शोध लागला नाही. मध्यान्ह काळ झाल्यानंतर मात्र गंगूबाईंनी तळमळीने श्रीतुकामाईंचा धावा सुरू केला. इतक्यात त्यांना श्रीतुकामाई येताना दिसले. गंगूबाईंना अत्यानंद झाला. तुकामाय तिला म्हणाले, “काय गं माय, उगाच का मला सतावतेस, चल आण लवकर वाढून.'' गंगूबाईने झटकन त्यांचे दर्शन घेऊन बसण्यासाठी आसन घातले व आत पात्रे वाढण्यासाठी गेली. तेवढ्यात श्रीतुकामाई उठून जवळच बागेत गेले व लगेचच परत आले. या सगळ्या खटाटोपामध्ये गावातील सुमारे तीनशे माणसे जमली. आता आपली फजिती होणार असे उभयता देसाई दांपत्यास वाटले. कारण स्वयंपाक तर पन्नास माणसांचाच तयार केला होता व माणसे जमली तीनशे ; पण त्याची काळजी सद्गुरूंना होती. श्रीतुकामाई आले ते सरळ पाकगृहात गेले व म्हणाले, “माय गं माय मला खूप भूक लागली, लवकर वाढ आणि सर्वांनाच जेवायला वाढ बरं का.'' हे ऐकून गंगूबाईच्या डोळ्यात पाणी आले ब ती म्हणाली “तुकामाय, स्वयंपाक तर फक्त पन्नास माणसांचाच केला आहे. आता कसे व्हावे?'' हे तिचे शब्द ऐकून 'वेडी रे वेडी'! म्हणून श्रीतुकामाईंनी नैवेद्याच्या पानातील अन्न सर्व अन्नात टाकले. त्या दिवशी जवळजवळ चारशे माणूस जेवले.

संत हात जया लागेल । तेथे अन्नास काय कमी पडेल ।
भोजन करूनी सकळ । उरे पाक तैसाचि ।।

देसाई दांपत्याने मौनेच सद्गुरू श्रीतुकामाईंच्या चरणावर मस्तक ठेवले.