|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

हरिहराची भेट

graphic footer

एकदा श्रीतुकामाईंचे गुरुबंधू श्रीगोचरस्वामी (सहजानंद महाराज) महायात्रेस निघाले. तत्पूर्वी श्रीतुकामाईंची भेट घ्यावी म्हणून तुपेगावी आले व तेथील पाटलाकडे श्रीतुकामाई कोठे आहेत याची चौकशी केली. पाटील म्हणाले की, ते सारखे रानोवनी संचार करतात, केव्हा येतील याचा नेम नाही, पण बहुधा आज-उद्या येतील. यावर श्री गोचरस्वामींनी पाटलांना सांगितले की, श्रीतुकामाई येताच त्यांना कोंडून ठेवा. पाटील म्हणाले, ठीक आहे. इकडे श्री गोचरस्वामी भोजनासाठी गावात निघून गेले. थोड्याच वेळात श्रीतुकामाई पाटलासमोर येऊन निर्भयपणे उभे टाकले. श्री गोचरस्वामींनी सूचना केल्यानुसार पाटलांनी श्रीतुकामाईंचा हात धरून त्यांना देवळात नेले व बाहेरून दरवाजास कुलूप लावले आणि त्वरित गावात जाऊन श्री गोचरस्वामींना ही वार्ता कळवली. स्वामी म्हणाले, “बा, बरे केले बाबा.' गुरुबंधूची भेट होणार म्हणून स्वामी आनंदले. भोजन त्वरित आटोपून स्वामी बऱ्याचशा भक्तमंडळींसह पाटलांसाबेत श्रीतुकामाईंच्या भेटीसाठी मंदिरी पातले. पाटलाने पुढे होऊन देवळाचे दार उघडले, तो काय आश्चर्य ! आत श्रीतुकामाई नाहीत ! सर्वजण आश्चर्यचकित झाले.

तुकयांनी सर्वांसी ठकविले । देउळीचे देउळी ग्रुप ज्ञाले ।
स्वासी म्हणे बरेच ठकविले । याने आम्हासी ।।

नंतर गावात व गावाबाहेर मंडळींनी पुष्कळ शोध केला, पण श्रीतुकामाईंचा पत्ता लागला नाही. श्रीतुकामाईंची भेट होत नाही असे पाहून स्वामी निराश होऊन उमरखेडला परत जाण्यास निघाले. इतक्यात वाटेतच एका उसाच्या मळ्यात श्रीतुकामाई एकाएकी प्रगट झाले व ते श्री गोचरस्वामींना हाका मारून म्हणाले, 'अरे जोगड्या, चल ये इकडे, येथे आपण निवांत भेटू !' स्वामींना फार आनंद झाला व ते मळ्यामध्ये शिरले. श्रीतुकामाई पुढे आणि स्वामी मागे असे बराच वेळ मळ्याच्या चिखलात चालल्यावर स्वामी थकून खाली बसले. त्यानंतर मात्र श्रीतुकामाई त्यांच्या जबळ आले आणि दोघे एकमेकांना कडकडून आलिंगन देऊन भेटले. एकमेकांच्या मनमोकळ्या गप्पा झाल्या. तसे ते दोघे एकच होते, एकरूपच होते ते दोघेही.

उमापती रमापती । अथेळत्वे एकची रूप असती ।
वैसे तुका आणि गोचर यती । एकरूप असती दोघेही ।।

त्यावेळी श्री गोचरस्वामींनी श्रीतुकामाईस प्रेमाने हातास धरून उमरखेडला नेले. असे विदेही व पूर्णावतारी महात्मे असतात, जे स्वत: कोणत्याही बंधनात न अडकता स्वच्छंदी जीवन जगतात.