|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

श्री तुकामाई मठ , शिरपूरजैन , जि. वाशिम येथे घडलेली श्रीतुकामाईंची विलक्षण लीला

graphic footer

क्षयरोगाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या , अतिजर्जर झालेल्या व त्या काळच्या औरंगाबाद , जालना व डोणगावच्या प्रख्यात वैद्यांनी हात टेकून शेवटी आता हा वाचत नाही, यास घरी घेवून जावे , म्हणून सांगितलेल्या मंगरुळ गावच्या शंकर यास त्याचे कुटुंबीय निराश होवून , आपल्या गावी परत घेवून जात असतांना प्रवासात त्यांचा मुक्काम शिरपूरच्या श्रीतुकामाई मठात पडला. त्या रात्री शंकरची प्रकृती फारच बिघडली व आता आपला कोणीही त्राता नाही असे मनात आणून शंकरने आपला सर्व भार श्री तुकामाईंवर टाकला व त्यांचा अखंड धावा सुरु केला. रात्री त्याला श्री तुकामाईंनी त्याच्या स्वप्नात येवून दर्शन दिले व घाबरु नकोस म्हणून अभय दिले. त्याच्या सर्वांगावरुन आपला अमृतमय हात फिरवला व आपल्या मुखातील चिलीम काढून शंकरच्या मुखात घातली. तेंव्हापासून शंकरची प्रकृती झपाट्याने सुधारत गेली व काही दिवसातच त्या काळात अतिशय असाध्य असलेल्या क्षयरोगातून तो ठणठणीतपणे बरा झाला.

जरी कोपला काळ प्रत्यक्षतेने । तरी तारितो सद्गुरु निश्चयाने ।।

समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।
असा सर्व भूमंडळीं कोण आहे ।।
जयाची लीला वर्णिती लोक तिन्हीं ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।।

( श्री मनाचे श्लोक )
दिवसेंदिवस पालट पडे । क्षय जाऊनी अक्षय सुख जोडे । स्वप्नदृष्टीचे महिमान एवढे । मग प्रत्यक्ष काय न करिती ।।

( श्रीतुकाराम महाराज चरित्र , ओवीबद्ध पोथी . ८-६७ )
दृष्टीमात्रे भवरोग हरती । मग यत्किंचित क्षयाची काय गती । श्रीगुरुमहिमा वर्णू किती । वेदांदिका जो अगम्य ।।

( श्री तुकाराम महाराज चरित्र , ओवीबद्ध पोथी , ८-७० )
शरण जाय जो भक्तीने । त्याचे तुटते भवबंधन । हे प्रत्यक्ष पहावे जाऊन । येहळेगांवी ।।

( श्रीतुकाराम महाराज चरित्र , ओवीबद्ध पोथी. ८-७३ )
संतश्रेष्ठ श्रीतुकामाईंच्या श्रीचरणीं माझे कोटी कोटी प्रणाम .

संकलन :- डॉ.डी.डी.देशमुख कामठेकर , औरंगाबाद.