दृष्ट रझाकारांना धडा दिला
वै. प. पू. श्री पुरुषोत्तमानंद महाराज, मठाधिपती, उमरखेड हे पूर्वाश्रमी (श्री लिंबाजी नाईक नेब) येहळेगाव मठात दीवाणजी असतांना रझाकारांनी ई.स. १९४७-४८ मध्ये मराठवाड्यात खूपच धुडगुस घातला होता. लूटमार, जाळपोळ, भयानक अत्याचार माजविले होते. एके दिवशी हे रझाकार श्री तुकामाईमठ येहळेगाव येथे आळे ब मठात घुसुन त्यांनी प.पू. श्री पुरुषोत्तमानंद महाराजांचे हातपाय बांधून त्यांना 'लादणीत कोंडून टाकले व बाहेरून कडी लावून टाकली आणि मठातील धान्य व इतर ऐवज लुटून बैलगाड्यात टाकून निघून जाऊ लागले. श्री पुरुषोत्तमानंद महाराज हे सारखे श्री तुकामाईंचा धावा करू लागले. त्यांना ग्लानी आली होती. ते सारखे श्री तुकामाईंच्या चिंतनात असतांना काय चमत्कार झाला पहा ! श्रीतुकामाईंनी त्यांना हाक मारून सावध केले, त्यांना बंधनमुक्त केले. ते उठून पाहतात तो काय! खोलीचे दार उघडे होते. ते बंधनमुक्त झाले होते. त्यांना ऐकू आले, “लिंबाजी, उठ, हे सर्व सांभाळ'' असे म्हणून रोहिल्यांनी लुटून नेलेला मठातील सर्व ऐवज श्रीतुकामाईंनी श्री पुरुषोत्तमानंद महाराजांच्या स्वाधीन केला व ते अंतर्धान पावले. जे रोहीले (रझाकार) मठातील धान्य व इतर सामान घेऊन मठाबाहेर निघून जाऊ लागले होते ते येहळेगावच्या शिवाराबाहेर जाऊच शकले नाहीत, त्यांना पुढचे काहीच दिसेनासे झाले, ते दृष्टीहीन (आंधळे) झाले व ते श्रीतुकामाईंना शरण येऊन मठात बैलगाडी व सर्व धान्य सामानासह परत आले, अशी ही श्री तुकामाईंची लीला ! परमदयाळू श्री पुरुषोत्तमानंद स्वामींनी त्या सर्व रझाकारांना (रोहिल्यांना) बळवटाच्या खीरीसह पोटभर जेवू घातले व मगच जाऊ दिले. सर्व रोहिल्यांनी क्षमायाचना करून मठातून गमन केले.