|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

श्री उपेंद्रस्वामींद्रारा सद्भक्तांना श्रीतुकामाई कृपेची प्रचीती

graphic footer

श्रीगुरूप्रतापे भवरोग त्वरित हारपतात, समंधादि-बाधा दूर होतात असे ऐकून डोईफोडे यांची बहीण तानूबाई श्रीगुरुचरणी येऊन लीन होताच तिची समंधबाधा श्रीतुकामाईंच्या कृपेने दूर झाली.
श्री उपेंद्रस्वामींनी चहुदेशी भ्रमण करून सर्वांना श्रीगुरू तुकामाईंचा मार्ग दाखवून लोकोद्धार केला. एकदा श्री उपेंद्रस्वामींचा प्रवासात असताना करखेली येथे मुक्काम पडला. तेथील नारायण नावाच्या देशलेखकाला ही बातमी कळाल्याबरोबर तो आपल्या कन्येला सोबत घेऊन धावत-पळतच श्री उपेंद्रस्वामींच्या दर्शनाला गेला व स्वामींना साष्टांग नमस्कार करून म्हणाला, “स्वामी, माझी मुलगी अतिशय आजारी असून ती अस्थिपंजर झालेली आहे. तिला अजिबात अन्न जात नाही. तिचा क्षणाचाही भरवसा राहिलेला नाही. आता मरो अथवा जगो, मी तिला तुमच्या पायावर घातले आहे.'' त्याचा हा दृढनिश्चय पाहून श्री उपेंद्रस्वामींनी “जय तुकाराम महाराज'' असे म्हणून त्या मुलीस तीर्थप्रसाद दिला. मुलीच्या तोंडी तीर्थप्रसाद पडताच तिची व्याधी दूर होण्यास सुरुवात झाली. एका महिन्यातच मुलगी निरोगी व सुदृढ झाली. नारायणाने आनंदी होऊन श्रीगुरुचरणी मिठी मारली व ब्राह्मणभोजन घालून सुखी नांदू लागला.

दुधी दही घालता | इरजू लागे तत्त्वता ||
तैसे दिननिशी प्रसाद घेता | रोग गेला तात्काळ ||
ऐसी कृपा करूनी त्वरित | इंगोलीस आले निश्‍चित ||
रामजी धन ठेवूनी हेत | मार्ग पाहात बैसला ||

हिंगोली येथील रामजी धन याची बहीण बयना हिला दुर्धर व्याधी जडली होती. शेकडो रुपये खर्च केले. उपायांची सीमा झाली, परंतु सर्व उपाय निरर्थक ठरले. शेवटी रामजीने सर्व भार श्रीतुकामाईंवर टाकला आणि श्री उपेंद्रस्वामींच्या दर्शनास बहिणीला घेऊन गेला.

सदयुरू स्मरण करूनी | देती तीर्थप्रसाद लागुनी ||
तत्काळ रोगूुक्त होवूनी | सुखी जाहले ||

असे कित्येक जण श्री उपेंद्रस्वामींच्या दर्शनाला येऊन त्यांच्या हस्ते श्रीतुकामाईंचा तीर्थप्रसाद घेऊन उद्धार पावते झाले. पंढरीचा बाबाराव, बाळकृष्ण वगैरे सर्व मंडळी अभिनव सेवा करून सुखरूप होऊन गेले. तसेच तुकाराम आणि विठाबाई यांनी रात्रंदिवस श्रीतुकामाईंची सेवा केली व ते श्रीगुरुचरणी लीन झाले. श्री उपेंद्रस्वामी ठायी ठायी भ्रमण करून श्रीतुकामाई आणि श्रीचिन्मयानंद स्वामींचे उत्सव-महोत्सव करू लागले. श्रीगुरू तुकामाईंच्या कृपाप्रसादामुळे अंध, बधिर, लंगडे, खुळे पावन होतात. ज्याच्या त्याच्या कर्मभोगाचे फळ गुरुकृपेने त्वरित मिळते व भक्तगण शिष्यगण सुखरूप होऊन जातात.

कर्तुम अकर्तुम अन्यथ कर्तुम | ह्या भगवंताच्या शकत्या जाण |
श्री सद्गुरू तुकारामाने | समाधी घेवल्यावरही केल्या ||