|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

ढोंगी गोसाव्यांना धडा शिकविला

graphic footer

मोठे योगी म्हणून श्रीतुकामाईंची लवकरच फार प्रसिद्धी झाली. अनेक हिंदू आणि मुसलमान त्यांच्या दर्शनास येऊ लागले. एकदा हैदराबाद (दक्षिण) येथील साई बीरभानगीरजी नांवाच्या योगाभ्यासी बैरागी महंताने श्रीतुकामाईंची परीक्षा घेण्यासाठी आपल्या दोन शिष्यांना येहळेगावला पाठविले. ते दोघे येहळेगावला पोहचले व श्रीतुकामाईंना आव्हान देऊन म्हणाले, “आपण तिघेही खड्डे खणून त्यात समाधी लावून बसू.'' ते दोघेही गोसावी ढोंगी होते तर श्रीतुकामाई साक्षात परब्रह्म! तिघेही तीन वेगवेगळ्या खड्ड्यांत समाधी लावून बसले. वरतून त्या गुहा बंद करण्यात आल्या. पंधरा दिवसांनंतर श्रीतुकामाईंची समाधी उतरली आणि डोळे उघडून पाहतात तो ते बैरागी मरून पडलेले दिसून आले. श्रीतुकामाई आता काय करतात हे पाहण्यासाठी गावच्या लोकांची गर्दी जमली. इतक्यात श्रीतुकामाईंनी एकाच्या हातातील काठी घेऊन त्या दोन्ही गोसाव्यांच्या अचेतन देहावर दोन दोन छड्या मारल्या. त्याबरोबर ते दोघेही सचेतन झाले, लगेच उठून बसले आणि श्रीतुकामाईंच्या पाया पडून त्यांची क्षमायाचना करून जसे आले तसे निघून गेले. या घटनेमुळे गावकरी मंडळींच्या मनात श्रीतुकामाईबद्दलचा आदर सहस्रपटीने वाढला.

ऐसे अपमानिले गोसावी । त्वरीत कृष्णामुख केले पाही ।
दिवसेंदिवस अंत नाही । पराक्रमा ज्यांच्या ।।