|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

श्री उद्धवबापू (श्री उपेंद्रस्वामी) पाटोदेकर यांची कथा

graphic footer

पाटोद्याच्या सीतारामपंतांचे चिरंजीव श्री उद्धव बापू माहूरगडाच्या श्री रेणुकामातेच्या दर्शनास गेले असता त्यांनी तेथे श्री निवृत्तीबुवा दैठणकरांच्या कीर्तनात श्रीतुकामाईंची कीर्ती ऐकली. ते ऋग्वेदीब्राह्मण होते. ते श्रीतुकामाईंच्या दर्शनासाठी उमरखेडमार्गे येहळेगावला निघाले असता उमरखेड मठातही श्री गोचरस्वामींद्वारा श्रीतुकामाईंचे माहात्म्य त्यांना सविस्तरपणे ज्ञात झाले. श्रीतुकामाईंना पाहताच बापूच्या मनाचे पूर्ण समाधान होऊन त्यांस त्यांचा उपदेश घेण्याची तीव्र इच्छा झाली. त्यांनी अनन्यभावे श्रीतुकामाईंचे पूजन करून उपदेश देण्याबद्दल प्रार्थना केली. त्यांचा निर्मळ भाव पाहून श्रीतुकामाईंनी त्यांना उपदेश दिला. बापू येहळेगावीच राहून तन-मन-धनाने श्रीतुकामाईंची सेवा करू लागले. लाकडे फोडणे, पाणी भरणे, उष्टी काढणे, देवपूजा करणे, गोवऱ्या लावणे अशी सर्व कामे बापू मनोभावे करीत. सद्गुरूंचे जेवण झाल्याशिवाय बापू जेवत नसत. श्रीतुकामाई कोठेही जेवत, त्यांचे दर्शन झाले नाही तर बापूला तीन-तीन दिवस उपवास घडे. हे काय श्रीतुकामाईंना कळत नव्हते? परंतु सद्गुरू बापूला मुद्दाम कसास लावून पाहत होते. बापू दर्शन घेण्यासाठी चरणाजवळ येताच श्रीतुकामाई त्यांना लाथेने मारीत. गावातही श्रीतुकामाईंनी सांगून ठेवले होते की हा बापू चोर आहे. याला कोणीही भिक्षा वाढू नका. याला उपाशीच राहू द्या; पण श्रीतुकामाई बापूंकडून पाय चेपून घेत. इतरांनी कोणी पाय चेपलेले त्यांना आवडत नसे; पण बापूंकरवी पाय चेपून घेण्याचा त्यांना कधीच कंटाळा येत नसे. एकेदिवशी भर उन्हाळ्याच्या दिवसात श्रीतुकामाईंनी बापूंचा हात धरून त्यांना मठाबाहेर काढून दिले व सर्वांना सांगून टाकले की याला कोणीही भिक्षा घालू नये, नसता त्याचा वंशक्षय होईल. मग बापू एखादेवेळेस शेवाळ्यास भिक्षा मागावयास जात. त्यांची गुरुचरणी वृत्ती जडली होती. त्यामुळे त्यांची तहानभूक सर्व हरवून गेली होती. असे एक तप म्हणजे बारा वर्षे बापूंची सेवा झाली. एकदा द्वादशीच्या दिवशी बापू देवपूजा करीत बसले असताना श्रीतुकामाई त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्या डोक्यात एका मोठ्या काठीने आघात केला व सर्व देव आडातील पाण्यात बुडवून टाकले. बापूंच्या डोक्यातून भळभळा रक्त वाहू लागले. बापू सद्गुरूंच्या चरणी “क्षमा करा कृपावंता” म्हणून पाय धरू लागले. वास्तविक बापूंना श्रीतुकामाईंनी डोक्यात काठी मारताच ते समाधी अवस्थेत पोहचले. ही श्रीतुकामाईंनी त्यांच्यावर केलेली कृपाच होय. त्या दिवसापासून बापूंची अवस्थाच बदलून गेली व श्रीतुकामाईंचे नुसते नाव काढले की त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहण्यास सुरुवात होई.