|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

सद्गुरूंच्या आज्ञापालनाचा चमत्कार

graphic footer

येहळेगावजवळ कोळी नावाचे एक गाव आहे. येथील एक कोमट्याची स्त्री श्रीतुकामाईंची भक्त होती. तिने एकदा नवस केला की तिच्याकडील कलिंगडाच्या वेलीचे पहिले फळ श्रीतुकामाईंना अर्पण करायचे आणि त्याप्रमाणे तिने पहिले फळ काढून ठेवले. इकडे श्रीतुकामाईंनी त्यांचे शिष्य श्री रामजीबापूंना ते फळ तिच्याकडून आणण्यासाठी कोळीला पाठवले. त्या स्त्रीनेही तोडून ठेवलेले फळ श्री रामजीबापूंकडे दिले; पण ते फळ त्यांना थोडेसे किडलेले दिसले म्हणून ते फळ त्यांनी तसेच त्या स्त्रीकडे परत केले व वेलीचे दुसरे उत्तम फळ तोडून घेतले व येहळेगावी येऊन श्रीतुकामाईंकडे दिले. फळ पाहिल्यावर श्रीतुकामाई रामजीबापूंना म्हणाले की, “हे फळ माझे नाही, असाच परत कोळीला जा. हे फळ परत त्या वेलीला जेथून तोडले तेथे चिकटवून ये व त्या स्त्रीकडून माझे फळ घेऊन ये.'' पुन्हा श्री रामजीबापू त्या बाईकडे कोळीला आले व तिला सर्व हकीकत सांगितली. तथापि, तोडलेले फळ वेलीला पुन्हा चिकटेल हे त्यांना खरे वाटेना. त्यांच्या मनात किंतु आला. त्यामुळे त्यांच्या हातून ते फळ काही वेलीला चिकटले नाही; पण कोमटिणीची श्रीतुकामाईवरील श्रद्धा अढळ होती. तिने श्रीतुकामाईचे नाव घेऊन वेलीला ते फळ लावताक्षणीच ते तेथे चिकटले. नंतर श्री रामजीबापू त्या स्त्रीने पूर्वी तोडलेले (किडलेले) फळ घेऊन येहळेगाबला आले व ते श्रीतुकामाईंना दिले. ते फळ कापून पाहिले असता अजिबात किडलेले नसल्याचे आढळून आले. हे पाहून श्री रामजीबापू चकित झाले. शिवाय कोमटिणीच्या हस्ते फळ वेलीला चिकटले हेसुद्धा त्यांनी श्रीतुकामाईंना सांगितले नाही; परंतु अंतर्ज्ञानी श्रीतुकामाईंनी रामजीबापूंना कोळी येथे घडलेली हकीकत विचारली असता रामजीबापूंनी खजिल होऊन सर्व सविस्तर हकीकत निवेदन केली. यावरून हे स्पष्ट होते की, सद्गुरूंच्या आज्ञापालनात अविश्वास दाखवू नये व संपूर्ण श्रद्धाभक्तीयुक्त अंत:करणाने त्यांचे आज्ञापालन करावे.