|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

नदीचे पाणी झाले लोणकढी तूप

graphic footer

उमरखेडजवळ पैनगंगा नदीकाठी मार्लेगाव नावाचे एक गाव आहे. तेथे एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्त लोकांच्या जेवणाच्या पंक्तीवर पंक्ती उठत होत्या; पण काही पंक्ती झाल्यावर अचानक तूप संपले. तुपाचा पुरवठा करणारा इसम काळजीत पडला. त्याने केलेल्या व्यवस्थेनुसार तुपाच्या घागरी काही त्या ठिकाणी वेळेवर पोहचल्या नसल्यामुळे हा घोटाळा झाला. तो अगदी रडवेला झाला. इतक्यात श्री तुकामाई तेथे अचानक प्रकटले व त्याला म्हणाले, “मी तुला सध्या उसने तूप देतो, परंतु तुझे काम झाल्यानंतर माझे मला परत देशील काय?" त्याने तात्काळ कबूल केले. मग श्रीतुकामाईंनी त्यास रिकाम्या घागरी सोबत घेऊन नदीकाठी चालण्यास सांगितले. तेथे त्या घागरी नदीच्या पाण्याने भरण्यास त्यास सांगितले व त्यांच्यावर आपली छाटी टाकली (पांघरली) व लगेच काढून घेतली. एका क्षणात त्या घागरीतील पाण्याचे शुद्ध लोणकढी तुपात रूपांतर झाले. तो गृहस्थ अत्यंत आनंदित झाला व जेवणावळीचा कार्यक्रम यथासांग चांगल्या पद्धतीने पार पडला. पुढे एक-दोन दिवसांनी त्याने व्यवस्था केलेल्या तुपाच्या घागरी आल्या तेव्हा श्रीतुकामाईंनी त्या घागरीतील सर्व तूप परत नदीत टाकून दिले. असे होते श्रीतुकामाईंचे योग सामर्थ्य.

सत्य संकल्पाचा दाता नारायण | सर्व करी पूर्ण मनोरथ ||