|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

श्री तुकामाईंची थोरवी व उपदेश

graphic footer

श्री तुकाराम महाराज हे विलक्षण अधिकारी होते. तिथे अनन्यतेशिवाय दुसरा मार्गच नव्हता. त्यावेळी दुसरेसुद्धा चांगले लोक होते, पण त्यांच्याजवळ ही सत्ता नव्हती. श्री तुकाराम महाराजांचा अधिकारच जास्त मोठा यात शंका नाही. अगदी विषयांतल्या माणसाला बाहेर काढण्याचा त्यांचा अधिकार होता. त्यांच्याजवळ जाऊन “मी शरण आलो आहे,'' असे म्हटले तरी पुरे होते. बाहेरून त्यांची वृत्ती जरा उग्र होती, पण जो त्यांच्याजवळ जाऊन निभावला तो परत येत नसे. ते अतिशय दयाळू होते. त्यांची वृत्ती नेहमी आनंदी असे व मुलांच्यात खेळण्याची त्यांना फार हौस होती. सर्व सिद्धी त्यांच्या पायी लोळत होत्या म्हणून कोणत्या वेळी ते काय अघटित करतील, याचा भरवसा नसे. ते कोणाचेही रूप घेऊ शकत होते. ते दुसऱ्यांची समाधी लावू शकत होते. आतापर्यंत केलेल्या वर्णनावरून श्री तुकाराम चैतन्य कोण होते याची साधारण कल्पना आली असेलच. ते एक अतिथोर ब्रह्मनिष्ठ सत्पुरुष, विलक्षण योगीराज आणि अतिथोर जीवन्मुक्त महात्मे होते. बहुजन समाजावर आईप्रमाणे माया करणारा हा संत बाह्यतः: जरी कडक दिसत असला तरी अंतरी इतका प्रेमळ व लोण्यासारखा मृदु होता की, दर्शनार्थी भक्तांना परत जाताना त्यांच्या वियोगाने रडू कोसळे. त्यांच्या हृदयात प्रेमाशिवाय दुसरे काहीही नव्हतेच, पण बाहेरून मात्र ते काय करतील याचा नेम नसे. परमार्थेच्छ्कांचा पाया मजबूत करून मगच त्यांच्यावर ते कृपा करीत. साधकांना देहाच्या दृष्टीने अनेक कष्ट करायला लावीत. जे या परीक्षेत टिकले ते फारच छान तयार झाले. साधकाची परीक्षा करताना तुकामाई त्यास मार देत, शिव्या देत, उपाशी ठेवीत किंवा पाणी भरायला लावीत किंवा हाकलून देत; परंतु साधक या कसोटीस उतरल्यानंतर त्याला पोटाशी धरून मोठ्या प्रेमाने त्याच्या अंगावरून हात फिरवीत. श्रीतुकामाई स्वत: जरी योगशास्त्रांमध्ये पारंगत होते, तरी सामान्य लोकांना भक्तीमार्गानेच जायला ते सांगत. “प्रपंचात सुखी रहा पण पांडुरंगाला विसरू नका,'' असे ते नेहमी सांगत. बाहेरच्या ढोंगीपणाचे अवडंबर माजवलेले त्यांना मुळीच आवडत नसे. श्री गोचरस्वामी व श्री रावसाहेब शेवाळकर यांच्यावर त्यांचे पुत्रवत प्रेम आणि अपार लोभ होता. श्रीतुकामाईंचे स्वरूप पाहताच पूज्यभाव उत्पन्न होई. सश्रद्ध आणि सरळ अत:करणाच्या माणसांबरोबर ते पुष्कळ बोलत. परतु श्रद्धाहीनांशी तुसडेपणाने वागून त्यांना शिव्या देऊन हाकलून लावीत. परमार्थाच्या खऱ्या जिज्ञासेने जो कोणी त्यांच्याकडे गेला तो संपूर्ण समाधान पावूनच परत आला. सात्त्विक आणि भाविक अंतःकरणाच्या माणसांवर श्री तुकामाई खूप प्रेम करीत, त्याची वाटेल ते ईच्छा पूर्ण करीत. नामस्मरण आणि संतसेवा करावी, म्हणजे सर्व साधते, हाच उपदेश ते सर्वांना करीत असत. ज्यांनी निष्काम सेवा केली त्यांना श्री तुकामाईंनी आमज्ञानाची प्राप्ती करून दिली तर ऐहिक सुखाची इच्छा करून सकाम भक्‍ती करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पुरवून त्यांना भक्तीमार्गाला लावले. औरंगाबाद येथे दिनांक 0२/0४/२0१२ रोजी मला प.पू.वै. श्री. दत्ताकाका यांच्या सत्संगाचा लाभ झाला. त्यांनी चतुर्थावृत्तीत श्री तुकामाईंबद्दलच्या खालील बाबीचा आवर्जून उल्लेख करण्याची सूचना यावेळी मला केली होती व त्याप्रमाणे तो उल्लेख मी येथे केलेला आहे. एकदा प.पू. श्री. बाबा बेलसरेंनी प.पू. श्री तात्यासाहेब केतकर (प.पू. श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे वाणी अवतार) यांना विचारणा केली असता ते म्हणाले की,

" भक्तांना हवे ते वरदान 'तथास्तु' म्हणून प्रदान करणे हा श्री तुकामाईंचा सहज स्वभाव नव्हता, तर तो त्यांचा विशेष अधिकार होता.”

प.पू. श्री तात्यासाहेब केतकर एकदा काही मंडळींसह येहळेगावला श्री तुकामाईंच्या समाधी दर्शनासाठी गेले असता या वारीत एक भाविक स्त्री त्यांना येहळेगावला भेटली होती. पुढे प.पू. श्री तात्यासाहेब आपल्या गावी - मालाडला (मुंबई) परत गेल्यानंतर काही दिवसांनी ती भाविक स्त्री मालाडला त्यांच्या दर्शनाला आली व म्हणाली, “महाराज, आपण आता पुन्हा येहळेगावला केव्हा जाणार?" तेव्हा प.पू. श्री तात्यासाहेब तिलाम्हणाले, “'माय, येहळेगाव म्हणजे बदामाचा शिरा आहे, रोज रोज नाही खाता येत.'' श्रीतुकामाईंच्या समाधी दर्शनासाठी श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे वाणी अवतार प.पू. श्री तात्यासाहेब केतकर महाराज (मालाड, मुंबई) हे शिष्यवृंदांसह 'श्रींसह' दि. ९/१२/१९५१ रोजी येहळेगांव मठात मुक्कामी थांबले होते. याशिवाय श्रीब्रह्मचैतन्य हनुमंत महाराज वावरहिंरेकर फेब्रुवारी १९५८ मध्ये आले होते. तसेच प.पू. श्री रामानंद महाराज (जालना), प.पू. श्री प्रल्हाद महाराज (साखरखेर्डा), डॉ. श्री. कुर्तकोटी महाभागवत (भूतपूर्व शंकराचार्य करवीरपीठ, कोल्हापूर), पू.श्री. के. वि. बेलसरे (बाबा) याही थोर थोर विभूती येहळेगावला दर्शनासाठी आल्याचा उल्लेख आहे.