|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

सद्भक्त कसोटीस उतरला

graphic footer

एकदा श्रीतुकामाईंनी तुपेगावच्या जानराव (यादवराव) देशमुखाला आपल्या स्वस्वरूपात श्री पांडुरंगाचे दर्शन घडविले. तेव्हापासून तो संपूर्णत: निर्विषयी झाला व श्रीतुकामाईंचा अनन्य निष्ठावंत भक्‍त बनला आणि संसार, घरदार, ऐश्वर्य सर्व काही सोडून येहळेगावलाच श्रीतुकामाईंच्या सेवेत अष्टौप्रहर राहू लागला. काही कालावधीनंतर त्यांची पत्नी बायजा वयात आली म्हणून जानरावची आई तुपेगावहून येहळेगावला आली. तेथे तिने श्रीतुकामाईंना प्रार्थना करून त्यांच्या अनुज्ञेने ती जानरावासह आपल्या गावी परतली. श्री. देशमुख यांची कसोटी घेण्यासाठी त्यांच्या ऋतूशांतीच्या दिवशी त्यांच्या घरी श्री तुकामाई प्रगटले व ते देशमुखांना म्हणाले, “अरे शिष्यराया, आज तुझ्याऐवजी मी रंगमहालात जाणार आहे. तरी तुझी बायको आज मला भोगण्यास दे.” हे शब्द कानी पडताच गुर्वाज्ञेचे पालन म्हणून देशमुख म्हणाले, “जशी आपली आज्ञा महाराज.” इकडे श्रीतुकामाई सरळ शयनघरात निघून गेले तर बाहेर लोक कुजबूज करू लागले व म्हणाले की, “असा गुरू जो शिष्याची बायको भोगण्यास मागतो, त्यांना हाकलून द्या.' परंतु देशमुखांची श्रीतुकामाईंवरील श्रद्धा किंचितही ढळली नाही. त्यांनी आपल्या शृंगारलेल्या पत्नीस रंगमहालात पाठवून दिले व दार लावून घेतले. इतक्यात आतमध्ये एक चमत्कार झाला. मंचकावर पहुडलेले श्रीतुकामाई एकदम षण्मासाचे बालक झाले व ते रडू लागले.

एकाएकी ट्रष्टी गेली । थोरमूर्ती लहान झाली ।
आश्चर्य वाटून नेत्रकमळी प्रेमाश्रू पातले ।।

देशमुख पत्नीने लगेच जाऊन बाळास घेतले. प्रेमामुळे तिला लगेच पान्हा फुटला. तिने बाळाला पदराखाली घेतले तेव्हाच त्या बाळाचे रडणे थांबले. देशमुखाने शयन मंदिराचे दार उघडताच सर्व लोकांना आतील दृश्य दिसले. निंदकांची व दुर्जनांची तोंडे बंद होऊन ते मनातल्या मनात खजिल झाले, तर भाविक भक्तजनांनी श्रीतुकामाईंचा जयजयकार केला. ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. सर्वजण देशमुखांच्या घरी बाळ पाहण्यासाठी जमले. थोड्याच वेळात पुन्हा एक आश्चर्य घडले. पलंगावरील बाळ अचानक गुप्त झाले आणि काही वेळाने श्रीतुकामाई गावाबाहेर प्रकट झाले. ही वार्ता समजताच त्यांच्या दर्शनासाठी गावात अलोट गर्दी जमा झाली. लोक आता नियमाने दररोज त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. जानरावासारखेच त्याची बायको बायजा हिलाही तिच्या नवऱ्याप्रमाणे निर्विषयी बनवून सन्मार्गाला लावण्यासाठी श्रीतुकामाईंनी ही कसोटी घेतली व बाळस्वरूपाची श्रीकृष्णलीला दर्शविली.

आश्चर्य करीती अवघे जन । धन्य तुका सदगुरू पूर्ण ।
अवतार पुरुष न कळे खुण । अन्यालागी तयाची ।।

धन्य ते श्रीतुकामाई आणि धन्य तो शिष्योत्तम देशमुख. अशी श्रद्धा गुरूवर असली पाहिजे म्हणजे आपले काहीही वाईट होत नाही हेच श्रीतुकामाईंना अनुभवास आणून द्यावयाचे होते.

श्रीतुकामाईंचा अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे त्यांच्या आज्ञेने तीर्थयात्रेसाठी निघाले असता फिरत फिरत कांचीला आले. तेथील चांदीच्या व्यापाऱ्याच्या पारमार्थिक दृष्टीने अधिकारी असलेल्या पत्नीने त्यांना आदरपूर्वक घरी आमंत्रित केले. श्रीमहाराजांना पाहिले की तिच्या मनात मातृप्रेमाचा जोरात उमाळा येई आणि तिच्या स्तनातून दूध वाहू लागे (तिला पान्हा फुटे). श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, "माझ्या गुरुंची अर्धीच विद्या मला साधली. येहळेगांवच्या देशमुखांच्या बायकोला श्रीतुकामाईंना पाहून दूध आले (पान्हा फुटला) आणि शिवाय ते लहान बालक बनले. मला मात्र लहान होता आले नाही."