|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

श्रीगुरू्सारीखा असता पाठीराखा

graphic footer

मंगरुळकर पटवाऱ्याचा शंकर नावाचा मुलगा क्षयरोगाने जर्जर झाला होता. औरंगाबादला त्याला इलाजासाठी घेऊन गेले असता काही उपयोग झाला नाही. वैद्यांनी हात टेकले. तेथून ते त्वरित जालन्याला निघून आले व तेथील महादेवशास्त्रींना दाखवले असता ते म्हणाले की, रोग फार बळावला असल्यामुळे यावर आता कोणताही उपाय शिल्लक राहिलेला नाही, तरी या मुलास ताबडतोब घरी नेऊन टाका. हे धन्वंतरीचे म्हणणे ऐकून सर्वजण एकदम घाबरून गेले व तेथून ते सर्वजण त्वरित डोणगावास आले. तेथे काही औषधोपचार करून सर्वजण सिरपुरास श्रीतुकामाईंच्या मठात मुक्कामी येऊन थांबले. त्या रात्री मुलाची अत्यंत बिकट अवस्था झाली होती व हा आता वाचणार नाही म्हणून सर्वजण निराश झाले. आता लवकर घर जवळ करावे असे सर्वांना वाटत होते. ही सर्व हकीकत मुलगा शंकर यास कळताच त्याने श्रीतुकामाईंशिवाय आता आपला त्राता कोणीही नाही असे मनात आणून आपला सर्व भार श्रीतुकामाईंवर टाकला व त्यांचा धावा सुरू केला.

जरी कोपला काळ प्रत्यक्षतेने| तरी कारितो सद्गुरू निश्चयाने ||

रात्री खूप उशिराने त्याला झोप लागली असता त्याच्या स्वप्नात श्रीतुकामाई गेले व त्याला म्हणाले, 'अरे ऐक रे ऐक शिष्यराया, तू अजिबात घाबरू नकोस' असे म्हणून त्याच्या अंगावरून त्यांनी हात फिरविताच सर्व काया दिव्य झाल्याचे त्यास वाटले. नंतर श्रीतुकामाईंनी आपल्या स्वत:च्या मुखातील चिलीम शंकरच्या तोंडात घातली. असा स्वप्नदृष्टांत होताच शंकर एकदम घाबरून जागा झाला. जवळची मंडळी त्याला काय झाले असे विचारू लागताच त्याने स्वप्नातील पाहिलेला सर्व वृत्तांत कथन केला. त्याचवेळी सूर्योदय होऊन पहाट झाली. सर्वांनी शंकरकडे लक्ष देऊन पाहिले असता त्याची काया सतेज दिसू लागली. त्यानंतर त्याच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होऊन काही दिवसांतच त्याचा क्षयरोग संपूर्णपणे बरा होऊन तो ठणठणीत झाला. त्यानंतर शंकरचे वडील शंकरसह श्रीतुकामाईंच्या दर्शनासाठी आले. त्यांनी तुकामाईंचे चरणी मस्तक ठेवले व बोललेला नवस फेडून घेतला.

दृष्टीमात्रे भवरोग हरती | मग यत्किंचित क्षयाची काय गती |
श्रीगुरुमहिमा वर्णू किती | वेदांदिका जो अगम्य||
ऐसा जगदोद्धारा कारण | तूकेंद्राचा अवतार जाण |
मूढ जडासी प्रावन करून | अलिप्ची वर्तती ॥
शरण जाय जो थक्तीने | त्याचे तुटते भ्रवबंधन |
हे प्रत्यक्ष पहावे जाऊन | येहळेगांवी ||