|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

निपुत्रिकांना संतान प्राप्ती

graphic footer

तळेगाव येथील एका कोमट्याच्या बाईचे लग्न होऊन वीस वर्षे झाली तरी तिला संतान नव्हते. ती येहळेगावास श्रीतुकामाईंच्या दर्शनासाठी पुत्रेच्छा घेऊन आली; परंतु तिला श्रीतुकामाईंनी शिव्या देऊन बाहेर घालवून दिले. ती बाई कष्टी होऊन स्वग्नामी परत गेली तो काय आश्चर्य ! ती घरी येताच त्या रात्रीच तिला गर्भ राहिला. यथावकाश नऊ महिन्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला.

दृष्टी पडताची सत्वर | शिव्या देवूनी घातली बाहेर |
गृही येताच चमत्कार | यर्थ उदरी संधवला ॥
फ्री श्रीणुरू येघ वर्षला | दृष्टी पडताची आनंद झाला |
वरी करीती दुर्वाक्याला | फ्री तो प्रसादचि खरा ||
ऐसे आनंदात असता | गर्थासी नवयास लोटता |
पुत्र प्रसवली ती कांता | उल्हासजनक अंतरी ||

काही दिवसांनी ती बाई पती व पुत्रासह येहळेगावला श्रीतुकामाईंच्या दर्शनासाठी आली. बाळास माऊलींच्या चरणावर घातले. मुलगा झाल्यास दोन हजारांचे अन्नदान करीन असा नवस ती बोलली होती. तेथे मठाची जागा लहान असल्याकारणाने दोन हजार माणसांचा स्वयंपाक येथे तयार करता येणार नाही अशी त्यांना शंका वाटली म्हणून पाकसिद्धी शेजारच्याच बागेत करू या असे त्यांनी ठरवले. श्रीतुकामाईंनी अंतर्ज्ञानाने हे जाणले आणि पाकसिद्धी येथे मठातच करा अशी आज्ञा केली; परंतु त्यांनी गुरुआज्ञेचे उलंघन करून स्वयंपाक मठात न करता बाहेरील बगीचात केला. सर्व मंडळी भोजनासाठी जमा झाली. पात्रे वाढली. जेवणास सुरुवात करणार इतक्यात जोरदार पाऊस सुरू झाला. सर्व अन्न वाया गेले व सर्व आमंत्रित उपाशीच परतले.

बाहेर पाकसिद्धी केली | जमली सर्व द्विजमंडळी |
पात्रे टाकीता तये वेळी | पर्जन्यशृष्टी झालीये ॥
ब्राह्मण उपवासी मेले | अन्न सर्व वाया गेले |
ऐसे कौतुक त्यावेळे | अघटीत घडले पै ||

दुसर्‍या दिवशी त्यांनी पुन्हा पाकसिद्धी केली. कालच्या पेक्षा दुप्पट लोक जेवणास आलेले पाहून तो मनात चिंतित झाला. काय करावे हे त्याला काहीच सुचेना. शेवटी त्याने श्रीगुरू तुकामाईंचे पाय धरले. त्याच्या मनातील भाव श्रीतुकामाईंनी जाणला. माऊलीच ती ! लेकरांचे अनंत अपराध पोटात घालतात, शरणागताला आसरा देतात, संकटात भक्तांचे रक्षण करतात. माऊलीला त्याची दया आली व ते म्हणाले आरे जा, कोठीतून मणभर कणीक घे आणि पाकसिद्धी करून सर्वांना तृप्त कर.' त्याने तसे केले. पाच हजार स्त्री-पुरुष जेवूनही अन्न उरून राहिले होते. संत प्रसादाची महतीच अशी असते. संत म्हणजे साक्षात देवच जनकल्याणासाठी पृथ्वीवर अवतार घेत असतात.

झाला एकची जयजयकार | पात्रे जोविली पाच सहस |
हर्षे कोंदले अंबर | स्री-पुरुषही संतोषले ||
जयजयकारे पिटली टाळी | आनंदली भक्त मंडळी |
तुकाराम तुकाराम गर्जू लागली | निजजन अवघे ॥

वऱ्हाडप्रांतीचे बाजीराव कोपरेकर पुत्रप्राप्तीची इच्छा घेऊन सपत्नीक श्रीतुकामाईंच्या दर्शनासाठी आले असता त्यांच्या पत्नीस श्रीतुकामाईंनी शिव्या देऊन हाकलून दिले. ते उभयता गावी जाताच त्यांच्या पत्नीस गर्भसंभूती झाली. कालांतराने ती प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न जन्मले. मुलाच्या बारशाच्या दिवशी तिने मनापासून श्रीतुकामाईंचे स्मरण करताच ते अचानक तिच्या घरी प्रगट झाले आणि आशीर्वाद देऊन अचानक गुप्त झाले.