|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

एका रात्रीत पंढरपूरला जाऊन आले

graphic footer

एकदा उमरखेडला एकादशीच्या कीर्तनात श्रीतुकामाई जाऊन बसले व कीर्तन ऐकू लागले. थोड्या वेळाने त्यांना त्यांच्या चिलमीची आठवण झाल्यामुळे ते कीर्तनातून एकदम उठून बाहेर आले. त्यांच्या मागोमाग काही मंडळी आली, पण ते कोठे गेले न कळे. पुष्कळ शोध केल्यानंतरही ते कोणास सापडले नाहीत.

इकडे तूकेंद्र काय करी | गुप्तपणे जाऊनी पंढरी |
पाहूनी विटेवरी श्रीहरी | आलिंगले तया ||

इकडे श्रीतुकामाई मनोवेगाने पंढरपूरला गेले व तेथे श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन बुक्का लावला, गळ्यात माळ घातली, प्रसाद घेतला आणि तेथून सरळ निघून द्वादशीच्या सकाळीच उमरखेडला वेशीजवळ प्रगट झाले. उमरखेडला रात्रभर कीर्तनाचा गजर चालू होता. सकाळ झाल्यावर काही लोक श्रीतुकामाईंचा शोध घेण्यासाठी गावात निघाले असता त्यांना वेशीतच श्रीतुकामाई प्रगट झालेले दिसले. त्यांच्या गळ्यात पुष्पहार ब कपाळाला बुक्का होता. सर्वजणांनी श्रीतुकामाईंचे दर्शन घेतले. एकाने विचारले की, “'तुकामाय, रात्री तुम्ही कोठे होता?"

तव म्हणती पंढरीसी | जाऊनी आलो त्करेसी |
आश्चर्य वाटले जनांसी | म्हणती हे खरे नोहे ||

तर महाराज म्हणाले की, हे काय मी आत्ताच पंढरीहून येत आहे; पण हे श्रीतुकामाईंचे बोलणे कोणासही खरे वाटले नाही. महाराजांनी आपली गंमतच केली असे ते समजू लागले. पण काही दिवसानंतर गावातील पंढरपूरला गेलेली वारकरी मंडळी परत आली. त्यांनी सांगितले की एकादशीला रात्री आम्ही राऊळात श्रीतुकामाईंचे दर्शन घेतले. त्यांनीदेखील विठोबाचे दर्शन घेतले हे आम्ही स्वत: पाहिले आहे. असे ऐकल्यावर सर्वांना श्रीतुकामाईंचा अधिकार कळाला व त्यांनी त्यांचा एकच जयजयकार केला. श्रीतुकामाईंना मात्र कोणी निंदो अथवा वंदो, त्याचे काहीच वाटत नसे. ते आपल्याच स्वानंदात मग्न असत.

लोक जयजयकार करीती | ते त्यास स्वप्नीही नसे प्रीती |
अधवा टुवक्यि निंदीती | तो आलिप्तची वर्ते ||