न्याहारीचे अन्न झाले जाईची फुले
शेवाळ्याहून श्रीतुकामाई तुपेगावाला आले. तेथे देशमुख यांच्याकडे श्रीतुकामाईंचा मुक्काम होता. महाराज पलंगावर बसले होते. भोवती ब्रह्मवृंद बसून वेदमंत्र घोष करीत होते. देशमुख पत्नी बायजाबाई यांनी यावेळी श्रीतुकामाईंना न्याहारीचा नैवेद्य दिला. त्यांनीसुद्धा पलंगावर बसूनच न्याहारी करण्यास सुरुवात केली. यावेळी तेथील ब्रह्मवृंद मनात साशंक झाले की श्रीतुकामाई शूद्रान्न भक्षण कसे करतात ? ब्राह्मणांच्या मनातले हे विचार श्रीतुकामाईंनी अंतर्ज्ञानाने जाणले आणि न्याहारीचे ताट एकदम भिरकावून देऊन तेथून तात्काळ उठले व नंतर कोठे गेले ते कळालेच नाही. इकडे ब्रह्मवृंदांना एक चमत्कार पाहावयास मिळाला. विखुरलेल्या न्याहारीच्या अन्नाची सुंदर, सुगंधी, शुभ्र जाईची फुले सगळीकडे उधळली गेली होती.
ब्राह्मणही तेथेच होती । विखुरले ते अन्न पाह्मती ।
तर शिजले तांदळ दिसिती । जाईची फुले ।।
हे आश्चर्य पाहून सर्व ब्राह्मण खजिल झाले व त्यांना श्रीतुकामाईंचा अधिकार कळाला. ते मनोमन नतमस्तक झाले व श्रीतुकामाईंचे दर्शन घ्यावे व क्षमायाचना करावी म्हणून तेथून ते निघाले. त्यांनी बरच शोध घेतला; पण त्यांच्या नशिबात श्रीतुकामाईंचे दर्शन नव्हते. खऱ्या संतांचे दर्शन होण्यासाठी पूर्वपुण्याईच लागते हे खरे.
ऐसे अनेक चमत्कार । दाविती श्रीणुरू दातार ।
पारे अंधजनासी पार । न कळे तयाचा ।।