|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

' पांडुरंगा, मला कांदा पाहिजे '

graphic footer

सात्विक आणि भाविक अंत:करणाच्या माणसांवर श्रीतुकामाई खूप प्रेम करीत व त्यांची वाटेल ती इच्छा पूर्ण करीत. एकदा गावातील गवळ्यांची पोरे गुरांना घेऊन जंगलात चारण्यासाठी गेली. त्यांना चारणीला लावून ती मुले नदीच्या पाण्यात खेळू लागली. इतक्यात श्रीतुकामाई तेथे गेले. त्यांना पाहिल्याबरोबर “अरे तुकामाई आले रे आले! ते आपले कपडे घेतील व इकडे-तिकडे टाकून देतील.'' असे ओरडून सर्व मुले पाण्याबाहेरआली आणि भराभर आपापली कपडे उचलू लागली. या गडबडीत एकाची पासोडी फाटली. तो मुलगा रडू लागला आणि म्हणाला “घरी एवढीच पासोडी आहे, आता आई मला मारील. श्रीतुकामाईंना त्याची दया आली व ते त्या मुलाला म्हणाले, “अरे वेड्या, उगाच रडू नकोस. थांब तुला मी पांडुरंगाची शाल देतो.'' असे बोलून त्यांनी आपल्या अंगरख्याखालून एक सुंदर शाल काढून त्या पोराला दिली. सर्वांना आनंद झाला. मग श्रीतुकामाई त्या मुलांसोबत काही वेळ हुतुतु खेळले. नंतर श्रीतुकामाई म्हणाले, “अरे पोरांनो, चला मला भूक लागली आहे. बघू कोणी काय आणले आहे ते!” सर्वांनी आणलेले विविध प्रकारचे खाद्यपदार्थ एकत्रित करून त्याचा गोपाळकाला श्रीतुकामाईंनी तयार केला व आपणांसह सर्वांना घेऊन ते जेवावयास बसले. इतक्यात एकजण म्हणाला, “तुकामाय तोंडी लावायला कांदा असता तर किती मजा येईल नाही?'' हे ऐकून श्रीतुकामाई ओरडले, “पांडुरंगा, मला कांदा पाहिजे.'' इतक्यात एक नवरा-बायको डोक्यावर कांद्याच्या टोपल्या घेऊन बाजाराला निघालेले होते. ते त्यांच्याजवळ येऊन म्हणाले, “तुकामाय, तुम्ही भेटलात हे फारच चांगले झाले. माझी भवानी करा, मी बाजाराला कांदे घेऊन जात आहे." असे म्हणून त्यांनी प्रत्येकाला दोन-दोन कांदे वाढले आणि ते नवरा-बायको पुढे निघून गेले. प्रत्यक्ष श्री पांडुरंग व श्री रुक्मिणी मातेने श्रीतुकामाईंची इच्छा पूर्ण केली व सर्व बाळगोपाळांना आनंदित केले. संतकवी पू. श्री. दासगणू महाराजांनी आपल्या 'संतकथामृतात' या प्रसंगाचे खालीलप्रमाणे वर्णन केले आहे -

धन्य धन्य कयाधुचे तीर | धन्य ती गुराखी पोरे थोर |
धन्य तुकाराय साधुवर | धन्य सोहळा न्याहरीचा ||
गोपांचा करून उद्गार | पंढरीस गेला परमेश्वर |
साधुसंगती क्षणभर | घडता कृतार्थ करिते की ||